esakal | इस्लामपूरकरांनी घेतला मोकळा श्वास; पण...

बोलून बातमी शोधा

 Islampur people  took a free breath; But...

दीड महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर इस्लामपूरकरांनी आज मोकळा श्वास घेतला. शहरातील व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे लोकही घराबाहेर पडलेत. वाइन शॉपसमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र आज येथेही दिसून आले. मात्र यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

इस्लामपूरकरांनी घेतला मोकळा श्वास; पण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली): दीड महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर इस्लामपूरकरांनी आज मोकळा श्वास घेतला. शहरातील व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे लोकही घराबाहेर पडलेत. वाइन शॉपसमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र आज येथेही दिसून आले. मात्र यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

"कोरोना' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या अटी शिथिल करून कमोडिटीनिहाय दिवस निश्‍चित करण्यात आलेत. आठवड्यात तीनच दिवस हे व्यवसाय सुरू राहणार आहेत. सोमवारी व्यापारी व व्यावसायिकांच्या बैठकीतील चर्चेनुसार नियोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, तहसीलदार रवींद्र सबनीस, राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशिरा यादी व दिवस निश्‍चित करून नियोजन जाहीर करण्यात आले आहे. 
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजननुसार शहरातील कंटेन्मेंटझोन आदेश रद्द करण्यात आला आहे.

इस्लामपूर शहर हे ऑरेंज झोनमध्ये आल्यामुळे व्यापारी आस्थापनांबाबत शिथिलता आली आहे. परंतु इस्लामपूर शहरातील झालेला "कोरोना' चा मोठा प्रादुर्भाव विचारात घेता भविष्यात पुन्हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्‍यक नियंत्रण विचारात घेऊन तालुका व शहर प्रशासनाने कमोडीटीनिहाय वस्तू विक्रीसाठी आठवड्यातील तीन दिवस निश्‍चित करून दिलेत. त्यानुसार कमोडीटीचे नाव, वस्तू विक्रीसाठी निश्‍चित केलेले दिवस व वेळ असे : किराणा दुकान, किराणा सुपर मार्केट, किराणा बझार, ऑईल मिल, घाऊक धान्य दुकान, आईस्क्रिम पार्लर (दुकानात गर्दी न करता घरी पार्सल नेणे), बेकरी मिठाईची दुकाने हे दररोज सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

फुले व हार विक्री (रस्त्यावर बसून विक्री न करता स्वतःचे दुकानामध्ये बसून विक्री करणे) फोटो स्टुडिओ, डिजिटल प्रिंटिंग, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, फर्निचर, टाईल्स, सॅनिटरी वेअर, सिमेंट, सळी, ऍल्यूमिनीयम, पॅनल, बार, पाण्याची टाकी किंवा सिंटेक्‍स टाकीविक्री, बांबू व तत्सम व्यवसाय हे सर्व हे शनिवार, रविवार व सोमवार सुरू राहणार आहेत. कापड दुकान, टेलर, स्पोर्टस्‌ बेअर, स्पोर्टस्‌ साहित्य खरेदी विक्री, किचन अप्लायन्सेन्स, होम अप्लायन्सेन्स, भांडी विक्री दुकाने, इलेक्‍ट्रिक अँड इलेक्‍ट्रॉनिक अप्लायन्सेन्स, दुरुस्ती विक्री, टू-व्हिलर फोर व्हिलर दुरुस्ती विक्री, सायकल दुरुस्ती व विक्री, मोबाईल विक्री व दुरुस्ती, ज्वेलरी, चप्पल, बैंग, सौंदर्य प्रसाधने, बुक स्टोअर्स, चष्मे विक्री व दुरुस्ती, घड्याळविक्री दुरुस्ती, गिफ्ट गॅलरी, ऑफसेट, फ्रेममेकर, स्टेशनरी, कटलरी, झेरॉक्‍स आदी बाबी मंगळवार, बुधवार व गुरुवार सुरू ठेवण्यात येणार आहेत.

या व्यतिरिक्त दूधविक्री, पिठाची गिरणी, कांडप यंत्र, सिलिंडर विक्री दुकाने, टेस्टिंग लॅब, कृषी साहित्य विक्री व दुरुस्ती, पशुखाद्य विक्री, बॅंक ग्राहक सेवा सुविधा केंद्रे, मिनरल वॉटर थेट घरपोच किंवा दुकानात विक्री करणे तसेच दवाखाना व मेडिकल हे अत्यंत अत्यावश्‍यक असल्याने हे दररोज सुरूच राहणार आहेत. हे सर्व व्यवसाय सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्येच सुरू ठेवण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. 

वाइन शॉप सुरू झाले 

उपविभागीय अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांच्यात आज बैठक झाली. त्यात आज दुपारीच वाइनशॉप सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आझाद चौक परिसरातील दोन वाइन शॉपचालकांनी ते सुरू केले. त्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी शर्थ केली परंतु गर्दी आवाक्‍याबाहेरची होती. 

बॅरीकेट्‌स न काढल्याने नाराजी 

कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गांधी चौक आणि भाजी मंडई परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी काल (ता. 4) ती अधिसूचना रद्द केली. तरीही आज दिवसभरात बॅराकेट्‌स काढण्यात आले नव्हते. त्यामुळे नागरिकांच्यातून नाराजी होती.