esakal | इस्लामपुरात  उधळला खुनाचा कट
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur police arrested a gang of six men who were to attempt murder.

लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी तिला कोठेतरी लपवून ठेवल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांचा खून करण्यासाठी इस्लामपूर येथे दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले.

इस्लामपुरात  उधळला खुनाचा कट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर : लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी तिला कोठेतरी लपवून ठेवल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांचा खून करण्यासाठी इस्लामपूर येथे दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले. आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास येथील वाघवाडी फाटा, कोल्हापूर नाका व वारणा हॉस्पिटल परिसरातून या संशयितांना पोलिसांनी उचलले. इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी दीपक ठोंबरे व सुरेश नलवडे यांनी ही कारवाई केली. ही माहिती पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सुशांत विलासराव शिंदे (वय 30, रा. इस्लामपूर, सध्या कऱ्हाड), विनल ऊर्फ बाळा शशिकांत कंटे (वय 23, रा. वारुंजी, विमानतळाजवळ, ता. कऱ्हाड), सूरज उत्तम घारे (वय 26, रा. रेठरे खुर्द, ता. कऱ्हाड), तुषार ऊर्फ गोट्या सुनील बोरगे (वय 24, रा. उंब्रज), मनोज मुरलीधर विभूते (वय 25, रा. लाहोटीनगर), निरंजन ऊर्फ चॉकलेट फुलचंद मानकर (वय 20, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद हवलदार दीपक बबनराव ठोंबरे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले,""या टोळीचा म्होरक्‍या सुशांत शिंदे हा असून त्याचे प्रल्हाद बाबुराव कुंभार (रा. इस्लामपूर) यांच्या मुलीशी गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपचे संबंध होते. शिंदे व ती मुलगी इस्लामपूर येथे रहात होते. त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून संबंधित मुलगी बेपत्ता आहे. त्यानंतर त्या मुलीला तिच्या वडिलांनी म्हणजेच कुंभार यांनी कुठेतरी लपवून ठेवले असावे असा संशय त्या मुलाला आला होता. त्याचा राग मनात धरून सुशांत शिंदे याने कऱ्हाड येथील पाच मुलांच्या टोळीला 40 हजार रुपये देऊन कुंभार यांचा खून करण्याची सुपारी दिली होती.

रविवारी पहाटे ही टोळी वाघवाडी रस्त्याला मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या कुंभार यांची वाट पहात वाघवाडी फाटा, वारणा हॉस्पिटल व सत्रे हॉस्पिटल (कोल्हापूर नाका) येथे दबा धरून बसली होती. दरम्यान इस्लामपूर येथील गुन्हे प्रकटीकरणचे हवलदार दीपक ठोंबरे व सुरेश नलवडे हे दोघेजण रात्रगस्तीसाठी त्या परिसरातून फिरत होते. यावेळी वाघवाडीजवळील साई बीअर शॉपीच्या पायरीवर एक तरुण संशयितरीत्या बसल्याचे त्यांना आढलले. त्याला पोलिसांनी हटकले, अधिक चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. थोड्या अंतरावरील वारणा हॉस्पिटलजवळ आणखी एक इसम संशयितरीत्या आढळला.

या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केली असता त्या दोघांनी आमचे आणखी चार साथीदार असून ते सत्रे चौकात थांबले होते, आता ते पळून गेले असावेत असे सांगितले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथकाने गोपनीय माहिती काढून इतर चार साथीदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सर्वजण सुपारी घेऊन प्रल्हाद कुंभार यांना गाडीने उडवून अथवा चाकूने त्याचा खून करण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले.

इस्लामपूर पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा कट रचणे व हत्यार बाळगणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वाघ तपास करीत आहेत. या संशयितांना पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वाघ, पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे, हवलदार दीपक ठोंबरे, सुरेश नलवडे, अरुण पाटील, अमोल चव्हाण, सूरज जगदाळे, जयराम चव्हाण, योगेश जाधव, सचिन सुतार, आलमगीर लतीफ, कॅप्टन गुंडेवाले यांनी सहभाग घेतला. 

खुनाचा दुसऱ्यांदा कट... 
कुंभार यांची मुलगी गेल्या नऊ महिन्यांपासून गायब असल्याने सुशांत शिंदे याने तिच्या वडिलांवर संशय व्यक्त करून त्यांना मारण्याचा दहा दिवसांपूर्वीही कट रचला होता. श्री. कुंभार मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्या ठिकाणी मागे- पुढे बरेच लोक असल्याने त्यांचा कट त्यावेळी फसला. म्हणून परत एकदा रविवारी त्यांनी हा दुसरा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला व कुंभार बचावले.