
इस्लामपूर : मालमत्ता आकारणी करवाढ प्रकरणी नगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या सुनावणीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
इस्लामपूर : मालमत्ता आकारणी करवाढ प्रकरणी नगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या सुनावणीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यात 28 ते 31 तारखेदरम्यान होणारी सुनावणी आता जानेवारी महिन्याच्या 19 ते 21 तारखेदरम्यान होणार आहे. तोपर्यंत नागरिकांना अपिले दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे.
शहरातील नागरिकांना आलेल्या घरपट्टी बिलांच्याबाबत असलेला रोष विचारात घेता पालिका प्रशासनाने अपिलीय समितीच्या माध्यमातून सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. ही सुनावणी 28 ते 31 डिसेंबर दरम्यान होणार होती. त्याआधी नागरिकांनी आपली अपिले दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.
शहरातील घरपट्टी, उपयोगकर्ता कराची आकारणी यावरून प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्यातून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत होत्या. शहर शिवसेना, वाळवा तालुका संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या बिलांना आक्षेप घेतला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने येत्या 28 ते 31 डिसेंबरदरम्यान अपील समितीमार्फत सुनावणी ठेवली होती. या समितीत तीन लोकप्रतिनिधी व दोन शासकीय सदस्य आहेत. नागरिकांच्याकडून येणाऱ्या अपिलांचा विचार करून ही समिती निर्णय जाहीर करणार आहे. या समितीमार्फत नागरिकांना दिलासा मिळेल आणि करात सवलत मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण यापूर्वी अपील समितीने तसे निर्णय दिले आहेत. शहरात विविध झोननिहाय मालमत्ता कराची आकारणी जाहीर केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. आताही तसाच निर्णय होण्याची शक्यता आहे; परंतु आता ही सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असल्याने ज्या नागरिकांना अपील दाखल करण्यास विलंब होत होता, अशांना आता मुदतवाढ मिळणार आहे.
प्रशासनाचे आवाहन
ज्या नागरिकांनी मार्च महिन्यात बिलाच्या पन्नास टक्के रक्कम भरून अपिले दाखल केली होती, त्यांनी आता पुन्हा अपील करण्याची गरज नाही, तर ज्यांची राहून गेली आहेत; त्यांनी ती प्रक्रिया करावी, असे प्रशासन व विविध राजकीय पक्षांनी आवाहन केले आहे.
"अपील समितीचे प्रमुख उपविभागीय अधिकारी असतात, त्यांच्या सूचनेनुसार सुनावणी प्रक्रियेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे.'
- अरविंद माळी, मुख्याधिकारी.
संपादन : प्रफुल्ल सुतार