इस्लामपूर : ऊसबिलाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

खरिपात मशागतीसाठी पैशांची गरज; डिझेल दरवाढीचा शेतीला फटका
Sugarcane
SugarcaneSakal

इस्लामपूर : मोसमी पावसाची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या मशागतीसाठी ऊसबिलाच्या दुसऱ्या हप्त्याची आशा लागली आहे. वाढलेल्या महागाईने शेतकरी कोलमडून गेला आहे. साखर कारखानदार याची कितपत दखल घेणार, याकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावर्षी पावसाचे आगमन लवकर होणार, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. शेतातील मशागतीसाठी शेतकऱ्यांनी जोर धरला आहे. डिझेलच्या दरवाढीचा फटका थेट मशागतीला बसला आहे.

एकतर उसाला दरवाढ मिळालेली नाही; त्यात रासायनिक खते, ट्रॅक्टरची मशागत यांच्या भाड्यात झालेली प्रचंड वाढ यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. मशागतीचे दर गगनाला भिडलेत. शेतकऱ्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष वाढतच चालला आहे. इंधनाबरोबर मजुरी, रासायनिक खते, मशागत, औषधांच्या किमतीचे दर विचारात घेता दहा वर्षांपूर्वी शेतमालाचे दर तेच होते.

वाळवा तालुक्यातील ऊस राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे साखराळे, वाटेगाव युनिट, हुतात्मा कारखाना (वाळवा), शिराळा तालुक्यातील फत्तेसिंगराव नाईक साखर कारखाना, कऱ्हाड तालुक्यातील यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना यांना पाठवला जातो. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित उसाच्या बिलावर ठरते. खरिपाची मशागत, बी-बियाणे आदींसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी या दिवसांत उसाचे दुसरे बिल मिळाले तर शेतकऱ्यांना आधार मिळतो. सर्वांच्या नजरा कोणता कारखाना दुसरा हप्ता किती देणार, याकडे लागल्या आहेत. तालुक्यातील साखर कारखाने ऊसबिलाचा दुसरा हप्ता साधारणपणे २०० ते २५० रुपये देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दृष्टिक्षेपात गाळप

गाळप : ३६ लाख ९ हजार टन

राजारामबापू कारखाना चार युनिट : २४ लाख १४ हजार टन

(साखराळे, सर्वोदय, वाटेगाव, जत)

हुतात्मा किसन अहीर कारखाना : ६ लाख १३ हजार टन

विश्वास सहकारी साखर कारखाना : ५ लाख ८२ हजार टन

सर्व कारखान्यांचा पहिला हप्ता : २ हजार ६०० रुपये

शेतकऱ्यांना खरिपासाठी आर्थिक हातभार लावणार आहे. संचालकांच्या बैठकीत निर्णय घेऊन लवकरच बँक खात्यावर योग्य रकमेचा दुसरा हप्ता वर्ग करण्यात येईल.

- राम पाटील,कार्यकारी संचालक, विश्वास सहकारी साखर कारखाना, चिखली

महागाई वाढल्याने त्या प्रमाणात उसाची दरवाढ झाली नाही. शेतीवरच सर्व अवलंबून असल्याने मिळणाऱ्या ऊसबिलातून आर्थिक उलाढाल चालते. ऊसबिलाचा दुसरा हप्ता मिळाला, तर खरीप पिकासाठी मोठा हातभार लागणार आहे.

- अरुण केसरे, भाटवाडी, ता. वाळवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com