वाळूतस्कराने केला जामखेडचा वीज पुरवठा खंडित

वसंत सानप
Sunday, 29 March 2020

खंडित झालेला विद्युतपुरवठा सुरळीत सुरू व्हावा, याकरिता वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, लोकप्रतिनिधींनीही त्यांना सूचना कराव्यात , अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 

जामखेड : येथील भुतवडा रस्त्यावर रविवारी (ता.29 )रोजी  पहाटे साडेचार वाजता वाळूतस्करामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. त्याच्या टिपरची लोखंडी खांबाला धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे निम्या जामखेड शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. अपघातानंतर मोठ्या आवाजामुळे नागरिक घाबरून रस्त्यावर धावले. नेमके काय घडले हे कोणालाच कळेना.

जामखेड शहरातील महावितरणच्या कार्यालयापासून अवघ्या 700 मीटर अंतरावर भुतडा रोडलगत इलेव्हन के.व्ही. विद्युत वाहिनीच्या लोखंडी खांब आहे. त्यावर वाळूचा टिपर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातामुळे तो वाकला. परिसरातून जाणाऱ्या इतर विद्युत वाहक तारा एकमेकांना घासल्याने शॉर्टसर्कीटमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला .

या अपघातामुळे विजेच्या तारा रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीवर गेल्या आहेत, त्याही खाली आल्या. हे पाहून नागरिक घाबरून गेले. घाबरलेल्या नागरिकांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. आणि येथील निर्माण झालेली परिस्थिती संबंधितांना सांगतली. त्यानंतर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पहाणी केली. आणि या परिसराचा रोहित्रापासून विद्युत पुरवठा तात्पुरता खंडित केला.

नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या घटनेत  कुठलीही जिवित हानी झाली नाही . मोठा अनर्थ टळला. मात्र निम्म्या जामखेडचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये भुतवडा रोड, मिलिंद नगर, संतोषी माता मंदीर परिसरातील काही भाग, तपनेश्वरचा काही भाग, बीड रस्त्याच्या काही भागाचा समावेश आहे.
खंडित झालेला विद्युतपुरवठा सुरळीत सुरू व्हावा, याकरिता वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, लोकप्रतिनिधींनीही त्यांना सूचना कराव्यात , अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jamkheds electricity supply disrupted by sandcastle