
सांगली महापालिका हद्दीत बुधवारपासून जनता कर्फ्यू; जीवनावश्यक सेवा सकाळी 11 पर्यंतच
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने आता जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज झाला. बुधवार (5) ते मंगळवार (11) या कालावधीत ही टाळेबंदी असेल. या काळात शहरात दूध, दवाखाने, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद राहतील. किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांनाही सकाळी सात ते अकरा या वेळेत होम डिलिव्हरी करता येईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये व काही तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातही जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी काही संघटना व नगरसेवकांनी केली होती. यामुळे सोमवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते. या बैठकीत सात दिवसाच्या जनता कर्फ्यूचा निर्णय झाला.
हेही वाचा: धक्कादायक! सांगलीत कोरोना बाधिताच्या घरावर हल्ला; 7 जणांवर गुन्हा
आयुक्त कापडणीस म्हणाले, 'महापालिका क्षेत्रात रोज सुमारे 200 च्या आसपास रूग्णसंख्या आहे. रूग्णसंख्या स्थिर असली तरी लॉकडाऊनमुळे रूग्णसंख्येत घट होणे आवश्यक आहे. शहरात हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढत आहे. तर होम आयसोलेशनमध्येही रूग्णांची संख्या वाढली आहे. शहरात अनेक ठिकाणी भाजी विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडून वेळेची मर्यादा व होम डिलिव्हरीची अट पाळली जात नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या पाठिंब्याने निर्णय झाला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याशी महापौरांनी चर्चा केली आहे. सर्वांच्या पाठिंब्याने ही टाळेंबंदी यशस्वी केली जाईल.'
लसीकरण सुरुच
महापालिका क्षेत्रात 18 वर्षांवरील तरूण व 45 वर्षांवरील नागरिकांचे स्वतंत्र लसीकरण सुरू आहे. मात्र लसी कमी प्रमाणात येत आहे. नोंदणी सुरु आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणेकडून लसीसाठी नागरिकांना कॉल करून बोलवले जाईल. कॉल तरच लसीकरण केंद्रात यावे. गर्दी करू नये. महापालिकेने कोविड रूग्णांसाठी मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले असून तेथे सध्या 66 जण उपचार घेत आहेत. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था मनपाकडून केली जाते. तसेच दानशूरांनी केंद्रासाठी मदत द्यावी.
हेही वाचा: इस्लामपुरात बुधवारपासून जनता कर्फ्यू; व्यवहार राहणार बंद
Web Title: Janata Curfew Decision Taken By Sangli Municipal Corporation From
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..