ना भाषणबाजी, ना तोडफोड, ना मोर्चा तरीही बंद! तोही शंभर टक्के सक्सेस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

प्रशासनाला निवेदने देऊन निषेध व्यक्त केला जातो. मात्र, आज ना निवेदने होती, ना मोर्चे. उत्स्फूर्तपणे आजचा "बंद' पाळण्यात आला

नगर ः नगर जिल्ह्याने यापूर्वी "बंद'च्या काळात अनेकदा दंगे, तोडफोड पाहिली आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरचा हा पहिलाच "बंद' असा होता, की ना तोडफोड झाली, ना चिथावणीखोर भाषणे. सगळ्यांनी घरात बसून "जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "जनता कर्फ्यू' पाळण्याच्या आवाहनाला अनेकांनी सोशल मीडियावर पाठिंबा व्यक्त केला होता. वृत्तपत्र विक्रेत्यांनीही सकाळी सातच्या आत वृत्तपत्रांचे वाटप करून घरचा रस्ता धरला. दररोज दूध घालणारे गवळीही रोजचा रतीब लवकर देऊन गेले.

हेही वाचा - कोण आहे ज्योतिषी - भविष्य ठरलं तंतोतंत खरं

जिल्ह्यात अत्याचार, चोरी, दरोडा, पाणी, रस्ता यांसह विविध प्रश्‍नांवर अनेकदा आंदोलने झाली. "बंद'ही पुकारण्यात आले. मात्र, आजचा "बंद' आगळावेगळा ठरला. प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवून त्यात सहभाग नोंदविला. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना अनेकदा व्यावसायिकांना "बंद' पाळण्यासाठी प्रसंगी दमदाटी करतात.

प्रशासनाला निवेदने देऊन निषेध व्यक्त केला जातो. मात्र, आज ना निवेदने होती, ना मोर्चे. उत्स्फूर्तपणे आजचा "बंद' पाळण्यात आला. "बंद'च्या काळात एरवी होणारी तोडफोड, दगडफेक, एसटी बसचे नुकसान, असे प्रकार झाले नाहीत. असा "कर्फ्यू' वर्षातून एकदा तरी व्हावा, अशीच अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

अभूतपूर्वच

कोपर्डी अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात मराठा मोर्चाने आंदोलने केली. मूक मोर्चा काढण्यात आला. तेव्हाही बंद पाळला गेला. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी महाराष्ट्राने आणि नगर जिल्ह्याने बंद पाहिला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पाळण्यात आलेला जनता कर्फ्यू अभूतपर्वच होता.

पोलिसांनाही नो टेन्शन 

बंद म्हटले की पोलिसांना टेन्शन. कर्फ्युच्या काळातही त्यांची धाकधुक वाढलेली असते. जाळपोळ, दगडफेकीच्या घटनांमुळे बंदला गालबोट लागते. या जनता कर्फ्युच्या वेळी मात्र, पोलिसांना कसलेच टेन्शन नव्हते. चुकून एखादा रस्त्यावर विनाकारण आलाच तर त्याला समज दिली जात होती. काही नाठाळांना मात्र, त्यांनी प्रसादही दिला. एकंदरीत आजचा बंद उत्स्फूर्त होता. शहरे, निमशहरी भागात तसेच ग्रामीण भागातही तो पाळण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janta curfew One hundred percent success