esakal | जत पालिका वार्तापत्र : नगरसेवकांमध्ये असंतोषाचं वारं
sakal

बोलून बातमी शोधा

 Jat Palika Newsletter: Dissatisfaction among corporators

कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र, गेल्या तीन वर्षांत लोकांना अपेक्षित विकास वगळता, तिन्ही पक्षांत असंतोषाचं वार पसरलं.

जत पालिका वार्तापत्र : नगरसेवकांमध्ये असंतोषाचं वारं

sakal_logo
By
बादल सर्जे

जत (जि. सांगली) : राज्यात तत्कालीन भाजप व शिवसेना सरकार असताना जतच्या मतदारांनी इतिहास घडविला. सन 2017 च्या जत नगरपरिषद निवडणुकीत जनतेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपला कमी अधिक बळ दिले. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र, गेल्या तीन वर्षांत लोकांना अपेक्षित विकास वगळता, तिन्ही पक्षांत असंतोषाचं वार पसरलं.

सत्ताधारी मंडळीत विकासाच्या मुद्द्यावर असणारे मतभेद व आपल्याच सहकाऱ्यांकडून विकासकामात खोडा घालणे. यातूनच असंतोषाचे पेटलेले राजकारण जत शहरातील जनतेने आजअखेर जवळून पाहिले आहे. शिवाय दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी जनतेला दाखविलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्याची जाणीव करून देणे, यामध्ये भाजप नगरसेवक एक सक्षम विरोधक म्हणून कमी पडला का?, असा सवाल जनतेतून होतो आहे. 
यासह भाजप विरोधी नगरसेवकांमध्ये ही अंतर्गत गटबाजीने असंतोष पसरला आहे. भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांनी कार्यक्रमापासून फारकत घेतल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

तर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका, नवीन नळपाणी पुरवठा योजना, शहरातील अंतर्गत रस्ते, गटारी, पालिकेची नवीन इमारत व प्रस्तावित गार्डनचा आराखडा, असे अनेक विषयांवर राजकारण घडलं. याच खापर एव्हाना मुख्याधिकारी, कर्मचारी यांच्यावर फोडण्याचा घाट सत्ताधाऱ्यांसह विरोधकांपैकी काही सदस्यांनी घातला. 

दरम्यान, आज हे चित्र वेगळे आहे, राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना हे प्रश्न सहज मार्गी लागू शकतात. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी पाठपुरावा करायला हवा होता, असा उलट प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे. भविष्यात याचे चांगलेच पडसाद जनतेच्या मनावर उमटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी मंडळींना असंतोषाचे राजकारण दूर करून विकासाचे मॉडेल उभे करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. हे विसरून चालणार नाही. 

महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी 
शहरातील कचरा उचलण्याचा ठेका, नवीन नळपाणी पुरवठा योजना, पालिकेची नवीन इमारत उभारणी व शहरातील गार्डनची सुधारणा करणे, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याला चालना देणे गरजेचे असून उर्वरित काळात सत्ताधारी ते पूर्ण करतील, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. 

संपादन : युवराज यादव