जत तालुक्‍यात 43 शेततळ्यांचे दीड कोटीचे अनुदान रखडले 

बादल सर्जे 
Thursday, 29 October 2020

चुकीच्या निर्णयामुळे काम पूर्ण होऊन आठ महिने झाले तरी जत तालुक्‍यातील 43 शेतकऱ्यांचे दीड कोटी इतके अनुदान रखडलेय. कर्ज काढून शेततळी घेतलेले शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेत. 

 जत : कृषी विभागाच्या नव्या शासन धोरणानुसार खोदाई, अस्तीकरण, कुंपण करून पाणी भरल्यानंतर सामुहिक शेततळ्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. चुकीच्या निर्णयामुळे काम पूर्ण होऊन आठ महिने झाले तरी जत तालुक्‍यातील 43 शेतकऱ्यांचे दीड कोटी इतके अनुदान रखडलेय. कर्ज काढून शेततळी घेतलेले शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेत. 

आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवलेत. वारंवार अधिकाऱ्यांकडे अनुदानाची मागणी करूनही दाद मिळत नाही. कृषी विभागाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अनुदान तात्काळ मिळावे यासाठी जत तहसील कार्यालयासमोर बहुजन समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वी तीन टप्प्यात अनुदान दिले जात असे. आता कृषी विभागाने सुधारणेच्या नावाखाली अनुदान एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, अनुदान दोन टप्प्यात मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यात राबविली जाते. सामूहिक शेततळे, पॉली हाऊस, शेडनेट हाऊस, पॅक हाऊस तसेच योजने अंतर्गत कांदा चाळ, शेततळे अस्तीकरण आदी योजनांसाठी अनुदान दिले जाते. महाराष्ट्रात केवळ अनुसचित जाती व जमाती संवर्गासाठी योजना राबवली जाते. 

शेततळ्यांचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर अनुदानाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना दिला जात असे. त्यामुळे पुढे अस्तीकरण आदी खर्चाचा भार उचलणे शेतकऱ्यांना सोपे जात असे. परंतू, शासनाने नवा कायदा लागू केल्याने शेततळ्याचे अनुदान एकाच टप्पात देण्याचा निर्णय घेतला आहे. खोदाई, अस्तीकरण, कुंपण करुन शेततळ्यात पाणी भरल्यानंतर अनुदान द्यावे, अशा मार्गदर्शक सूचनाही करण्यात ल्या आहेत. शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे. 

जत तालुक्‍यातील शेतकरी गरीब आहे. स्वतः चार लाख खर्च करून शेततळे बांधणे शक्‍य नाही. मात्र, शासनाने एकच टप्प्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शेततळ्याची कामे पूर्ण होऊन शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे. कृषी विभागाने तात्काळ अनुदान द्यावे यासाठी जत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. 
- जक्काप्पा सर्जे, जत विधानसभा प्रभारी 

वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार... 
सामुहिक शेततळ्याचे अनुदान देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार लेखी पत्रव्यवहार केला जात असून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल. 
- हणमंत मेंडीदार, तालुका कृषी अधिकारी

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jat taluka, grants of Rs