जयंत पाटील म्हणाले, "इथल्या'  सत्ताकारणात अजून लक्ष घातलं नाही 

Jayant Patil Comment On Sangli ZP President Election
Jayant Patil Comment On Sangli ZP President Election

सांगली - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या राजकारणात संशयकल्लोळ वाढला आहे. नव्या सत्ता समीकरणांची जुळवाजुळव करताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा "किमान समान कार्यक्रम' कसा जुळवून आणायचा, याचे त्रांगडे निर्माण झाले आहे. कॉंग्रेसचे काही सदस्य भाजपच्या वळचणीला उभे असल्याने त्यांच्याविषयी शंका घेतल्या जात आहेत.

राज्यातील सत्तेच्या जोरावर हे गणित जमू शकेल, मात्र स्थानिक राजकीय गणित मोठे अडचणीची ठरण्याची शक्‍यता असल्याने शिवसेना, रयत आघाडीचे नेते सावध भूमिकेत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता, मात्र त्यात बदल होणार हे निश्‍चित आहे. अधिवेनशनाचा काळ असल्याने आठवडाभर कार्यक्रम पुढे जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छुप्या हालचालींवरच भर राहील. भाजपच्या इच्छुकांनी किमान पक्षातील सदस्यांना विश्‍वासात घेण्याचा कार्यक्रम आखला आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा खेळ अर्थातच जयंत पाटील यांच्या पुढाकारावर अवलंबून असेल. त्यांनी अद्याप लक्ष घातलेले नाही.

विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्या भुमिकेसही महत्त्व

आमदार विश्‍वजीत कदम, विशाल पाटील यांच्या भूमिकाही महत्वाच्या राहणार आहेत. हे सारे जुळल्यानंतर शिवसेनेसोबतच्या चर्चा सुरु होतील. त्यानंतर मग रयत क्रांती आघाडीचा निर्णायक कौल कुणाच्या बाजूने जातो, याचे गणित मांडावे लागणार आहे. हे करताना कॉंग्रेस एकजूट राहील का, इथंपासून प्रश्‍न सुरु झाला आहे. कॉंग्रेसचे संख्याबळ एकने कमी झाले आहे. दुसरीकडे विक्रम सावंत यांच्या रिक्त जागेची निवडणूक अद्याप लागलेली नाही. ती जागा रिकामी राहील. त्यामुळे कॉंग्रेसकडे आठ सदस्य आहेत. पैकी सलगरे येथील जयश्री पाटील यांचे पती तानाजी पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे. शिराळ्यातील शारदा पाटील यांचा निर्णय गुलदस्त्यात आहे, कारण तेथील कॉंग्रेस नेते सत्यजीत देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हे दोन्ही सदस्य "व्हिप' बंधनात राहतील का, हा कळीचा मुद्दा असेल. 

"झाकली मूठ सव्वा लाखाची'

वाळव्यातील रयत क्रांती आघाडीने महाविकास आघाडीला मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाच तर तसे जमेलही, मात्र महाडिक गट, नायकवडी गट, सी. बी. पाटील हे पारंपारिक जयंत पाटील विरोधक जयंतरावांची ताकद वाढवण्यास मदत करतील का, याविषयी पुन्हा प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या स्थितीत "किंगमेकर' ठरणाऱ्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या पाच सदस्यांबाबत असून "झाकली मूठ सव्वा लाखाची' अशी भूमिका घेतली आहे. हा संशयकल्लोळ सुरुच राहणार आहे. 


""सांगली जिल्हा परिषदेच्या राजकीय घडामोडीत नेमकी काय भूमिका घ्यायची हे अद्याप ठरलेले नाही. राज्यात महत्वाच्या घडामोडी सुरु आहेत. त्यामुळे तारिख ठरल्यानंतर पुढे चर्चा होतील.'' 
- जयंत पाटील
कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी 

""अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार आहे. नव्या तारखा जाहीर झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरु होतील. एकूण परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. तूर्त आम्ही काहीही भूमिका जाहीर केलेली नाही.'' 
- अनिल बाबर, आमदार, शिवसेना 

""एकूणच राजकीय परिस्थिती गंभीर आहे. अशावेळी काय निर्णय घ्यावा, कशासाठी घ्यावा, याबाबत सार्वत्रिक गोंधळाची स्थिती आहे. माझ्याशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्क सुरु आहे, मात्र जिल्हा परिषदेत काय करायचे, याबाबत अद्याप काही बोलणे झालेले नाही. आमचे सदस्य मात्र आपणास भक्कम आधार हवा, अशा मानसिकतेत आहेत. वेळ आली की निर्णय घेऊ.'' 

- अजितराव घोरपडे
माजी मंत्री, शिवसेना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com