जयंतरावांचे 'ते' खेळ सुरू राहणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Jayant Patil

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर हा कोपरा कायम राहणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

जयंतरावांचे 'ते' खेळ सुरू राहणार?

sakal_logo
By
जयसिंग कुंभार,

सांगली - गेल्या साडेसहा वर्षांत आर. आर. पाटील, मदन पाटील आणि पतंगराव कदम या तीन मात्तबर नेत्यांचे निधन झाले. जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्वाची एक मोठी पोकळी तयार झाली. त्यात स्वाभाविकपणे जयंत पाटील यांनी जिल्ह्याचे नेते म्हणून स्थान मिळवले आहे. अर्थात आधी दोन काँग्रेसमधून हे स्थान ठरत होते. आता त्यात भाजपचीही भर पडली आहे. जयंतरावांच्या आजवरच्या राजकारणात भाजपचा एक कोपरा नेहमीच राहिला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर हा कोपरा कायम राहणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

फेब्रुवारी २०१५ आर. आर यांचे निधन झाले. त्यानंतर मे मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत जयंत पाटील, मदन पाटील आणि संजय पाटील यांची आघाडी झाली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये उडी मारत खासदार झालेल्या संजय पाटील यांच्याशी अशा आघाडीला तेव्हा कोणी अभद्र ठरवले नाही. की त्याबाबत कोणी फारशी कोणी खळखळही केली नाही. इतके हे नैसर्गिक संबंध होते. गेल्या सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. काँग्रेसने भाजपसोबतच्या आघाडीला आक्षेप घेत जयंत पाटील यांना दोन पाऊल मागे येण्यास भाग पाडले आहे. महाविकास आघाडी म्हणून बँकेची निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह धरताना शिवसेनेने आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून जयंतरावांच्या चालींना काहीसा ब्रेक लावला आहे.

हेही वाचा: विधान परिषदेसाठी कोल्हापुरात भाजपकडून अमल महाडिक

जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे नेतृत्वाची कधीच उणीव नव्हती तरीही स्थापनेपासून राष्ट्रवादीला जिल्ह्यातून तरी विधासभेत क्रमांक एकचे स्थान मिळवता आलेले नाही. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, बाजार समित्या असोत की बँक सर्वत्र काँग्रेसची कमी अधिक मदत घ्यावी लागली आहे. हे शल्य जिल्हा नेतृत्वाचा अश्‍वमेध सोडलेल्या जयंतरावांना नक्की वाटत असेल. जयंतराव जिल्ह्याच्या राजकारणात १९८५ च्या सुमारास सक्रिय झाले. जवळपास ३५ वर्षे झाली. तेव्हा काँग्रेस कमिटीसमोरील रेस्टहाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी केलेले एक विधान एका ज्येष्ठ पत्रपंडितांनी ऐकवले. तेव्हा जिल्ह्यात नेत्यांची मांदियाळी होती. त्या रोखाने ते म्हणाले, ‘‘बाहेर पाऊस पडत असेल तर छत्री घेऊन बाहेर पडायची घाई करण्यापेक्षा पाऊस कधी थांबतो, याची वाट पाहिली पाहिजे.’’ सांगलीत अनेक महापूर..पूर येऊन गेले आहेत.

राज्यातील सत्तेचेही त्यांनी उन्हाळे पावसाळे अनुभवले आहेत. साडेसहा वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेत निर्विवाद सत्ता आली. मात्र राज्यातील सत्तांतरामुळे त्यांना राज्यस्तरावर बॅकफूटवर रहावे लागले. महाविकास आघाडीने सत्तेमुळे ते पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आले आहेत. गेलेली सत्तास्थाने मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हाभर पक्षविस्तार सुरू केला आहे. या निवडणुकीच्या रुपाने वात लागली आहे.

हेही वाचा: "ही वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी..."; नवाब मलिकांचं नवं ट्विट

बँकेच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील यांची निवड झाल्यानंतर आणि भाजपला बँकेत बरोबरीचा वाटा राहिल्याने काँग्रेस गेली सहा वर्षे बाजूलाच पडली होती. विश्‍वजित कदम, विशाल पाटील, विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील अशी काँग्रेसमध्येही उगवतीचे दिवस आहेत. जिल्हा परिषद, बाजार समिती, नगरपंचायती, नगरपालिका आणि अंतिमतः महापालिका अशा निवडणुका आहेत. तिथे या निवडणुकीचे पडसाद उमटणार असल्याने जयंतरावांना पूर्वीचे खेळ तसेच सुरू ठेवणे तितके परवडणार नाही. ते काय करतात हे लवकरच कळेल?

loading image
go to top