उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,

Jayant Patil Talk On Personality of Uddhav Thackeray
Jayant Patil Talk On Personality of Uddhav Thackeray

इस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्या, सर्वसामान्य जनतेला हे सरकार न्याय देईल, असे प्रतिपादन मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. 

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदाच इस्लामपूरला आल्याने कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर नागरी सत्कार व सभेत ते बोलत होते. श्री. पाटील यांच्यासह आमदार मानसिंगराव नाईक यांचाही सत्कार झाला. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार राजू शेट्टी, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, माणिकराव पाटील, विनायक पाटील, प्रतीक व राजवर्धन पाटील प्रमुख उपस्थित होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

श्री. पाटील म्हणाले,""निवडणुकीनंतर विचित्र हालचाली झाल्या. सकाळी वेगळं, दुपारी आणि रात्री वेगळं अशी विचित्र उलथापालथ अनुभवायला मिळाली. राज्यातील जनतेला आम्ही तिघांनी सत्तेत यावं, अस मनापासून वाटत होतं. शरद पवार यांनी ते करून दाखवलं. शिवसेनेबरोबर जाताना मागच्या सरकारच्या चुका, अपयश विचारात घेतल्या. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासकीय कामात नव्हते. सरळ माणूस म्हणून त्यांना अनुभवले आहे. महाराष्ट्राला खरे आणि स्पष्ट बोललेले आवडते. हे नवे व्यक्तिमत्त्व सर्वांना विश्वासात घेऊन राज्याचा गाडा चालवेल. राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. शिवाय मेट्रो व अन्य प्रकल्पांचे 2 लाख कोटींचे कर्ज वेगळे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.'' 

सोडून गेलेले परत येण्यासाठी फोन करताहेत

ते म्हणाले, ""कर्जमाफी आणि अन्य कामांसाठी थोडा वेळ लागेल. सांगली जिल्ह्यातील प्रश्नांकडे गेल्या पाच वर्षांत दुर्लक्ष झाले. दुष्काळ, पाणी प्रश्न, वाकुर्डे योजना व प्रलंबित प्रकल्पांना चालना द्यायची आहे. जिल्ह्याने भाजपला जी संधी दिली, त्याचा उपयोग जिल्ह्याला झाला नाही म्हणून यावेळी चित्र बदलले. महापुराचा आढावा घेतलाय, पडलेली घरे बांधून देऊ. अधिवेशनानंतर ते काम सुरू होईल. थोडा वेळ द्या. राष्ट्रवादीला सोडून सरकार येऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. सोडून गेलेले परत येण्यासाठी फोन करताहेत. बेरजेचे राजकारण करण्याचा आदर्श यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात राष्ट्रवादी राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल. आपण सर्वांसोबत काम करू.'' 

पवार यांच्या नावाची किमया निकालात दिसली

ते म्हणाले,""इस्लामपुरात बरेच प्रश्न आहेत. भुयारी गटारीसाठी आलेले खर्च करा, नवीन निधीची चिंता करू नका. सत्ता नसताना लोक मागे राहिले याला मोल आहे. मतदारसंघातील जनतेने दिलेल्या विश्वासामुळे राज्यात मी चांगले काम करू शकलो. शरद पवार यांच्या नावाची किमया निकालात दिसली यातच राष्ट्रवादीचा विजय. त्यांच्या नेतृत्वाखालीच सरकार झाले पाहिजे हे राज्याने मान्य केले.'' 

पवार म्हणतील ते धोरण, जयंतराव बांधतील तेच तोरण मान्य

श्रीनिवास पाटील म्हणाले, ""शरद पवार म्हणतील ते धोरण आणि जयंत पाटील बांधतील तेच तोरण आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीत जयंतरावांचे मोठे योगदान आहे. राजू शेट्टी यांनी योग्यवेळी चांगला निर्णय घेतला. जयंत पाटील यांनी परिवर्तन घडवून आणले. त्यांनी राजारामबापूंची उणीव भरून काढली. मोदींनी ज्यांचे बोट धरले ते आमचे नेते आहेत. त्यांच्या साथीने जयंतरावांनी परिवर्तन केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जयंतरावांच्या साथीने राज्याचा विकास घडेल. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.'' 

संकटग्रस्त शेतकऱ्यांला आधाराची गरज

श्री. शेट्टी म्हणाले,""सत्ताबदल अनपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा केल्या. राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांला आधाराची गरज आहे. सातबारा कोरा करण्यासाठी जयंतरावांनी पुढाकार घ्यावा. थकीत बिलातून मुक्त करा.'' 

जयंतपर्व सुरू

श्री. डांगे म्हणाले,"जयंतपर्व सुरू झाले आहे हे मान्यच करावे लागेल.'' आमदार नाईक म्हणाले,""वाळवा तालुक्‍याने साथ दिल्याने माझा विजय झाला.'' जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, पी. आर. पाटील, कॉंग्रेसच्या सरचिटणीस मनीषा रोटे, महांकालीच्या अध्यक्ष अनिता सगरे, नगरसेवक खंडेराव जाधव यांची भाषणे झाली. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, अँड. चिमण डांगे, दादासाहेब पाटील, सचिन हुलवान, झुंजारराव शिंदे, अरुण कांबळे, झुंझार पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते. 

तहसीलच्या उद्‌घाटनाला ठाकरे 

आमच्याच काळातील तहसील कार्यालय इमारत बांधून तयार आहे, येत्या 17 जानेवारीला त्याच्या उद्‌घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले. बापूंची जन्मशताब्दी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीच निमंत्रण दिले आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी शेवटी शेर सादर करत विरोधकांना इशारा दिला. ते म्हणाले,"चांद सितारे सूरज मेरे साथ रहे, जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ रहे, यू शाखोंसे गिर जाये वो पत्ते नही हम, आँधी से कोई कहदो, अपनी औकात में रहो.''  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com