राणेंच्या पनवतीमुळेच भाजपची गाडी घसरली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेविरोधात भाजपचे खासदार नारायण राणेंनी तोफ डागली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे खासदार सरसावले आहेत. त्यामुळे कोकणात सेना विरुद्ध राणे अशी रंगत निर्माण झाली आहे.

रत्नागिरी - खासदार नारायण राणेंची दखल आम्ही घेत नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे राणेंच्या वक्‍तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारला काहीही बाधा पोचणार नाही. उलट राणेंच्या पनवतीमुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली, अशी टीका करत शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेविरोधात भाजपचे खासदार नारायण राणेंनी तोफ डागली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे खासदार सरसावले आहेत. त्यामुळे कोकणात सेना विरुद्ध राणे अशी रंगत निर्माण झाली आहे. राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते.

हेही वाचा - महाराष्ट्रातील सरकारवर खासदार नारायण राणेंची ही टीका

राज्यातील सध्याचे सरकार देशासाठी आदर्श

त्यांना प्रत्युत्तर देताना खासदार राऊत म्हणाले, राणेंच्या कोणत्याच वक्‍तव्याची दखल आम्ही घेत नाही. जनतेने त्यांना आपली जागा दाखवून दिलेली आहे. कावळ्यांच्या शापाने गाय मरत नाही अशी म्हण आपल्याकडे आहे. त्या म्हणीप्रमाणे राणेंच्या कोणत्याही वक्‍तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील स्थापन केलेल्या सरकारला बाधा पोचणार नाही. राणेरुपी पनवतीमुळे देवेंद्र यांची गाडी घसरली असून राणेंनी स्वतः सावरावे. राज्यात स्थापन झालेले सरकार संपूर्ण देशाला आदर्श देईल असा कारभार करणार आहे. महाराष्ट्राचे अनुकरण देशातील लोक आजही करत आहेत आणि भविष्यातही करतील. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वाकडे अभिमानाने पाहत आहोत.

हेही वाचा -  सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत कोरगावकरांचे बंड कोणाच्या पत्त्यावर? 

राणेंनी वनवासात जावे

राणेंची वक्‍तव्य ही वनवासानात जाण्याची चिन्हे आहेत. आयुष्यभर ठेकेदारी केली, दमदाटी करून पैसे गोळा करण्याचे काम केले. ते राणे आता अज्ञातवासात आहेत. त्यामुळे भुतकाळ आठवत असून आपण कुणाला फसवले हे आठवत असल्यामुळे त्यांची ही बडबड सुरू आहे. त्यांनी आता वनवासात जावे आणि शेवटचे दिवस हरीनामाने मार्गक्रमण करावेत.

- विनायक राऊत, खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vinayak Raut Comment On Narayan Rane