Jayant Patil : संयमी जयंतराव एका शब्दात अडकले! आबांच्या निधनानंतर भाषणशैली आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil and Rahul Narvekar

गेल्या ३५ वर्षांच्या राजकारणात जयंतरावांनी विरोधकांचा पद्धतशीरपणे राजकीय ‘कार्यक्रम’ केला, नागपूर विधानसभा अधिवेशनात मात्र जयंतराव एका शब्दात अडकले...

Jayant Patil : एका शब्दात अडकणारे जयंतराव आबांच्या निधनानंतर झालेली भाषणशैली आक्रमक

सांगली - ‘मी टप्प्यात आल्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’ करतो,’ असं सांगणाऱ्या जयंत पाटील यांची राजकीय भाषणशैली संयत मानली जाते. गेल्या ३५ वर्षांच्या राजकारणात जयंतरावांनी विरोधकांचा पद्धतशीरपणे राजकीय ‘कार्यक्रम’ केला, मात्र जाहीर व्यासपीठावरून बोलताना त्यांचा तोल कधीही सुटला नाही. नागपूर विधानसभा अधिवेशनात मात्र जयंतराव एका शब्दात अडकले...

अभियंता असलेले जयंतराव नेहमी तोलून-मापून आणि मोजके बोलतात. एखाद्या वादग्रस्त विषयावर विचारले तर ‘होय, मला माहितीच नाही,’ असे म्हणून त्यातून मोकळे होतात. त्यावरून राज ठाकरे यांनी त्यांची खिल्लीही उडवली होती. आर. आर. पाटील राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. तोवर जयंतराव पक्षाचा राज्याचा चेहरा नव्हते. आबांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी जयंतरावांनी भरून काढली. त्यानंतर त्यांची भाषणशैली आक्रमक झाली. आबांच्या भाषणाएवढा खुसखुशीतपणा त्यांच्या शैलीत नसला तरी वर्मावर बोट ठेवणे आणि संधी मिळेल तिथे कोपरखळ्या हाणणे, यामुळे त्यांची अलीकडची अनेक भाषणे गाजली. काही भाषणांनी विरोधकांना घायाळ केले. विशेषतः मंत्री चंद्रकांत पाटलांशी त्यांचा कलगी-तुरा रंगला.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा घराणे आणि राजारामबापू घराणे असा उभा संघर्ष दीर्घकाळ राहिला आहे. त्यात जयंतरावांनी दादा घराण्यातील अनेकांचा राजकीय ‘कार्यक्रम’ देखील केला. त्यासाठी प्रसंगी भाजपला छुपी ‘रसद’ पुरवली, परंतु जाहीर व्यासपीठावरून बोलताना त्यांनी दादा घराण्यावर पातळी सोडून कधीही टीका केली नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतरावांवर अनेकदा घणाघाती टीका केली. त्याला उत्तर देतानाही त्यांनी संयत अशीच भाषा वापरल्याचे दिसते. वादग्रस्त विधानामुळे प्रायश्चित घेण्याची वेळ त्यांच्यावर कधी आली नव्हती. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना, ‘दाढीवाल्यांवर विश्‍वास ठेवता येत नाही,’ असं ते म्हणाले होते.

त्यावेळी विरोधकांनी जयंतरावांना कोंडीत पडकले होते. त्यानंतर काही महिन्यांनी जयंतरावांनी दाढी वाढवली. बराच काळ ते दाढीवाले झाले होते. जयंतराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असले तरी सर्वच पक्षांमध्ये त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले आहेत. त्यामुळे काल विधानसभेत जयंतरावांच्या तोंडून गेलेल्या चुकीच्या शब्दामुळे अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिक होते. त्यांनी स्वतः ‘गेल्या ३५ वर्षांत माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा असंसदीय शब्द गेला नाही,’ असा खुलासा केला. शिवाय हा शब्दही सरकारविषयी होता, असेही स्पष्ट केले. सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या निलंबनासाठी दबाव आणला आणि विधानसभेचे अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले. तेल लावलेले पैलवान म्हणून वावरणारे जयंतराव काल एका शब्दात अडकले.