जयंत पाटील यांनी केली शाळांबाबत मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

सांगली ः सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दुपारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांनी 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली.

सांगली ः सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दुपारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांनी 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाचा धोका टाळण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी, खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांना आता पंधरा दिवसांची सुटी मिळणार आहे. फक्त दहावीच्या परीक्षा वेळेत होतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रातील शाळांना सुटीची घोषणा केली होती. त्यातून ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये वगळण्यात आली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दुपारी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेत ग्रामीण भागातही सुटी जाहीर केली. त्यांचा हा निर्णय सांगली जिल्ह्यासाठी लागू असणार आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत आज नियोजित असलेली डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता विकास परीक्षाही ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता. ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी होणार होती. याबाबत विद्यार्थ्यांना आज सकाळी ते केंद्रावर दाखल झाल्यानंतरच माहिती मिळाली होती. आता उद्यापासून पंधरा दिवस शाळा बंद राहणार आहेत.

पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा झाली असली तरी अद्याप त्याबाबतचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी सांगितले. त्यामुळे सुटीचे स्वरुप कसे असेल? शिक्षकांसाठी काय नियम असतील, याबाबत काही तासांत स्पष्टता होईल, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JAYANT PATILS BIG ANNOUNCEMENT