esakal | सांगली बाजार समितीत "करेक्‍ट कार्यक्रम'; जयंतरावांचा कॉंग्रेस, भाजपला धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil's politics Sangli market committee; stake to Congress & BJP

सभापतींसह सात संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला; जयंतरावांनी सांगली बाजार समितीच्या राजकारणात या निमित्ताने "करेक्‍ट कार्यक्रम' राबवल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगली बाजार समितीत "करेक्‍ट कार्यक्रम'; जयंतरावांचा कॉंग्रेस, भाजपला धक्का

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : बाजार समितीच्या मागील निवडणुकीत पॅनेलचा झालेला पराभव राष्ट्रवादीचे नेते व पालकमंत्री जयंत पाटील यांनी चांगलाच लक्षात ठेवला. प्रभारी पणनमंत्रिपदाचा पदभार आल्यानंतर त्यांनी प्रशासक नियुक्त करून सत्ताधारींना म्हणजेच पर्यायाने कॉंग्रेसला धक्का देत हिशेब पूर्ण केला. त्यानंतर संचालकांनी विनंती केल्यानंतर सहा महिने मुदतवाढीची शिफारस केली. या शिफारसीमागे संचालकांनी पक्षांतर करण्याचा सौदा ठरल्याचे स्पष्ट होते आहे. सभापतींसह सात संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत सौदा पूर्ण केला; तर जयंतरावांनी बाजार समितीच्या राजकारणात या निमित्ताने "करेक्‍ट कार्यक्रम' राबवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सन 2015 मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पॅनेल विरूद्ध राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिवंगत नेते मदनभाऊ पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुका कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ. कदम पॅनेलने बाजी मारत 14 जागा निवडून आणल्या; तर जयंतरावांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. अडीच वर्षापूर्वी बाजार समितीत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर विरोधी मदनभाऊ गटाचे दिनकर पाटील यांनी सभापतिपद मिळवले. त्यानंतर समितीमध्ये सर्वांचा मिळून-मिसळून कारभार सुरू झाला. 

26 ऑगस्ट 2020 रोजी बाजार समितीची मुदत संपली. विद्यमान संचालकांना मुदतवाढ की प्रशासक नियुक्ती अशी स्थिती निर्माण झाली. तशातच पणनमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार जयंतरावांकडे आला. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संचालकांना मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली. परंतु जयंतरावांनी प्रशासक नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. जयंतरावांची ही खेळी म्हणजे कॉंग्रेसला धक्काच होता. या खेळीनंतर प्रशासक मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा सभापती दिनकर पाटील यांच्यासह संचालकांनी मुंबईत जयंतरावांची भेट घेतली. तेव्हा तासगाव बाजार समितीत मुदतवाढ आणि सांगलीत प्रशासक का? अशी चर्चा रंगली. अखेर संचालकांच्या विनंतीनुसार जयंतरावांनी संचालकांना मुदतवाढ देण्याची शिफारस केली. पणन विभागानेही सहा महिने मुदतवाढ दिली. 

संचालकांना मुदतवाढीच्या शिफारसीमागे काही दडले असावे? अशी शक्‍यता वर्तवली जात होती. अखेर जवळपास महिन्यानंतर गोपनीयपणे ठरलेला सौदा सर्वांसमोर उघड आला. सभापती दिनकर पाटील यांच्यासह सात संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानिमित्त जयंतरावांनी गत निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत बाजार समितीत राष्ट्रवादीचे पारडे जड केले. त्यांचा हा "करेक्‍ट कार्यक्रम' म्हणजे कॉंग्रेस व भाजपला धक्का मानला जात आहे. 

निवडणुकीवर लक्ष 
जयंतरावांनी सभापतींसह सात संचालकांना राष्ट्रवादीत घेतले असले, तरी त्यांच्यासाठी सहा महिन्यानंतरची निवडणूक महत्त्वाची असेल. निवडणुकीत पॅनेल निवडून आणल्यानंतरच खऱ्या अर्थाने मागील पराभवाचा वचपा निघेल. जयंतरावांनी मिरज पूर्व भागावर या निमित्ताने पकड घट्ट केली असली; तरी अद्याप जतमधील आमदार विक्रमसिंह सावंत गट ठाम आहे. त्यामुळे निवडणुकीत काय होणार? याचीही उत्सुकता वाढली आहे. 

संपादन : युवराज यादव