esakal | महापालिकेसाठी जयंतरावांची मदनभाऊ गटाशी जवळीक
sakal

बोलून बातमी शोधा

Jayantarao's closeness to Madanbhau group for Sangali Municipality

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे.

महापालिकेसाठी जयंतरावांची मदनभाऊ गटाशी जवळीक

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे. 

जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांना पक्षात घेऊन त्यांनी याची सुरवात केली. महापालिकेतील मदनभाऊंना मानणारा कॉंग्रेस नगरसेवकांचा एक मोठा गटही राष्ट्रवादीत जाणार होता, पण कॉंग्रेस नेत्यांनी आपली वजाबाकी सध्या तरी रोखली होती. कॉंग्रेसच्या नेत्या आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न कॉंग्रेसचे मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी विफल ठरवले होते.

विशाल पाटील यांनीही जयश्रीताईंची भेट घेऊन कॉंग्रेस न सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात जयंत पाटील यांनी मदन पाटील गटाचे काही नगरसेवक गळाला लावले. त्यांना ताकद देण्याचे कामही ते करत आहेत. महापालिका क्षेत्रात मदन पाटील गटाची ताकद मोठी होती. मात्र या गटाला सध्या तोलामोलाचा नेता नाही. जयश्री पाटील या गटाचे नेतृत्व करत आहेत. पण, त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे हा गटही अस्वस्थ आहे. 

मदनभाऊ गटाने जयंत पाटील यांचे नेतृत्व सहजपणे स्वीकारलेले नाही. तसेच विशाल पाटील यांचेही नेतृत्व त्यांनी स्वीकारलेले नाही. मदन पाटील यांच्या निधनानंतरही हा गट एकत्र राहिला. मात्र आता बदलत्या राजकीय समीकरणात या गटाला नेतृत्वाची गरज भासत आहे. ते कॉंग्रेसचे मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी पुढाकार घेऊन या गटाचे नेतृत्व करावे, अशी एका गटाची इच्छा आहे. त्यातूनच मदन पाटील गटाचे काही नगरसेवक सध्या डॉ. कदम यांच्या नेतृत्वात कामही करत आहेत. पण, विश्‍वजित कदमही यांनी अजून महापालिकेतील राजकारणात पूर्ण लक्ष घातलेले नाही. त्यामुळे हा गट अस्वस्थ आहे. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील करत आहेत. 

आज मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त जयंत पाटील यांनी कृष्णा नदीवरील समाधिस्थळी जाऊन मदन पाटील यांना आदरांजली वाहिली. या निमित्ताने त्यांनी मदन पाटील गटाला पुन्हा एकदा भावनिकदृष्ट्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असली तरी कॉंग्रेसचे सदस्य जास्त आहे. शिवाय येत्या फेब्रुवारी महिन्यात महापालिकेत महापौर निवड असल्याने भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी जयंत पाटीलच सक्षम असल्याची भावना काही नगरसेवकांना वाटते. स्थायी समिती सभापती निवडीवेळीच राष्ट्रवादीने येथे डाव केला होता, पण तो फसला. त्यानंतर भाजपच्याच महापौर गीता सुतार यांनीच जयंत पाटील यांना महापालिकेत लक्ष घालण्याची विनंती केल्याने खळबळ उडाली होती. महापालिका क्षेत्रातील भाजपचे दोन्ही आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात ब्रदेखील काढत नाहीत. मात्र चंद्रकांत पाटील येथील भाजप सदस्यांवर लक्ष ठेवून आहेत.

सध्या या दोन प्रदेशाध्यक्षात वाक्‌युद्ध जोरात आहे. त्यामुळे महापौर निवडीवेळी या दोघांतही मोठे शह-काटशहाचे राजकारण रंगू शकते. अर्थात जयंतरावांना कॉंग्रेसने साथ दिली तरच ते काही तरी करू शकतील अन्यथा त्यांच्या सदस्य संख्येवर काहीही होणार नाही. राज्यात सत्ता तिन्ही पक्षांची आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता असूनही भाजपचे काही नगरसेवक सध्या अस्वस्थ आहेत. कुपवाड येथील हॉस्पिटल, कचरा प्रकल्प अशा अनेक कोट्यवधीच्या प्रकल्पाबाबत काहीच निर्णय होत नसल्याने भाजपमधील काठावरील काही जणांची जयंतरावांशी सलगी वाढल्याची चर्चा आहे. 
जयंतरावांनाही इस्लामपूर नगरपालिकेतील पराभव खुपतो आहे.

महापालिका निवडणुकीतही आलेल्या अपयशाचे उट्टे भाजप व कॉंग्रेसमधील अस्वस्थ नगरसेवकांच्या माध्यमातून ते काढू शकतील असे तर्क सध्या सुरू आहेत. दरम्यान, विश्‍वजित कदम यांनी नुकताच कॉंग्रेसच्या ट्रॅक्‍टर रॅलीवेळी त्यांचे नाव न घेता कॉंग्रेस फुटणार नाही हा बालेकिल्ला अभेद्य राहील असा इशारा दिला होता.

त्यामुळे जयंतरावांनाही महाविकास आघाडीच्या धर्माचे भान ठेवावे लागणार आहे! अर्थात जयंतराव व मदनभाऊ यांच्यातील वैमनस्याचा इतिहास ताजाच असल्याने मदनभाऊंना मानणारे कट्टर कार्यकर्ते कॉंग्रेस सोडायला तयार नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रवादी भाजपचेच नगरसेवक गळाला लागतात काय याचीही चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. 

संपादन : युवराज यादव

loading image