नेत्यांच्या हुबेहूब नकला करणारा ‘राष्ट्रवादी’ अवलिया (व्हिडिओ)

डॅनियल काळे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे उत्तम नकलाकार आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांपासून ते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यापर्यंत, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यापासून ते विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत सगळ्यांचे हुबेहूब आवाज, उठण्या बसण्याची पद्धत याची हुबेहूब नक्कल करून ते लोकांना हसवितात. या कलेमुळे ते चांगलेच लोकप्रिय आहेत.

कोल्हापूर - शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे उत्तम नकलाकार आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांपासून ते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यापर्यंत, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यापासून ते विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत सगळ्यांचे हुबेहूब आवाज, उठण्या बसण्याची पद्धत याची हुबेहूब नक्कल करून ते लोकांना हसवितात. या कलेमुळे ते चांगलेच लोकप्रिय आहेत. राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते एकत्र आले की, जया कर रे पवार साहेबांची नक्कल असे म्हटले की, साक्षात पवार साहेबच बोलत असल्याचा अनुभव येतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी एकदा रात्री जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना फोन केला आणि पवार साहेबांचा आवाज काढून त्यांची चांगलीच फिरकी घेतली. विषय एका आंदोलनाचा होता. ए. वाय. पाटील या फोनमुळे चांगलेच अस्वस्थ झाले. पवार साहेबांचा एवढ्याशा गोष्टीला फोन कसा काय आला. याचा विचार करत असतानाच त्यांना कोणीतरी सांगितले की, जरा जयकुमार शिंदेंना विचारा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ए. वाय. पाटील यांनी जयकुमार शिंदे यांना सर्किट हाऊसला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांना खुलासा झाला की, हा फोन शरद पवारांचा नसून जयकुमार शिंदे यांचा आहे. 

पवार साहेब बोलतात कसे?, मीटिंगला बसतात कसे?,  एखादा विषयावर मिश्‍‍कील टिपण्णी करतात कसे? याची हुबेहूब नक्कल ते करतात. याचबरोबर माजी आमदार महादेवराव महाडिक, एन. डी. पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आण्णासाहेब नवणे, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची ते हुबेहूब नक्कल करतात. राजकीय कार्यकर्त्याचा मेळावा, गर्दी असते एखादा ठिकाणी जयकुमार शिंदेसमोर घोळका जमलेला असला की नक्की समजायचे. शिंदे कोणाची तरी नक्कल करत आहेत.
या कलेमुळे ते चांगलेच प्रसिद्ध आहेत. अगदी शरद पवारांपर्यंत त्यांची ओळख आहे. अजित पवारही त्यांना नावानेच हाक मारतात. पण, सर्वांना हसविणारे हे शिंदे वैयक्तीक जीवनात मात्र अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. मी राजकारणात प्रसिद्ध असलो तरी माझ्या वैयक्तिक खूप अडचणी आहेत.

या अडचणी न दाखवता मी नेहमी हसत खेळत राहतो. पण, माझ्या कुटुंबीयांना याचा खूप त्रास झाला आहे. पक्षाने माझ्यासाठी काही तरी करायला हवे होते,अशी खंतही ते व्यक्त करतात. पण, तरीही पक्षाचा कोणता कार्यक्रम, मेळावा असला तरी ते कधी चुकवत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaykumar Shinde special story