माचनुरमधील जेटाशंकरचे मंदिर पाण्याखाली

हुकूम मुलाणी
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नीरा व भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या तालुक्यात नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माचनुर येथील जेटाशंकरचे मंदिर सध्या पाण्याखाली गेले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिल्या.
 

मंगळवेढा : नीरा व भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या तालुक्यात नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माचनुर येथील जेटाशंकरचे मंदिर सध्या पाण्याखाली गेले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिल्या.

उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील व पुणे जिल्ह्यातील 18 धरण क्षेत्रातील मुसळधार पाऊस पडत असल्याने दौंड येथून दोन लाख 18 हजार 253 क्युसेसने पाणी भीमा नदीत सोडले असून उजनी धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेसने पाणी भीमा नदीत सोडले आहे, शिवाय नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे माचनुर येथील जेटाशंकरचे मंदिर सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले. 

नदीकाठी असलेल्या उचेठाण,बठाण, तामदर्डी, राहटेवाडी, ब्रह्मपुरी, माचनूर, सिद्धापूर ,तांडोर, बोराळे, आरळी या नदीकाठी असलेल्या गावाला महसूल प्रशासनाने गावात दवंडी देऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी नदीपात्रातील मोटरी काढून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.

तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी मंगळवेढा व बोराळे महसूल मंडळाचे मंडलाधिकारी संबंधित गावचे तलाठी व कोतवाल यांच्यासहित नदीकाठी जाऊन नागरिकांना पुराच्या पाण्यात न जाण्याच्या सूचना देत नागरिकाच्या मदतीबाबत तलाठी व मंडलाधिकारी यांना गावात सतर्क राहून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तर, गेल्या दहा वर्षापासून प्रथम नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे लोकांची पाणी पाहण्यासाठी व पाण्याचे सेल्फी काढून घेण्यासाठी बेगमपूरच्या पुलावर व माचनूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये गर्दी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jetashankar Temple wnst underwater at machnur