जोतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 April 2019

  • चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा प्रारंभ
  • यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या केल्या उभ्या.  
  • मुख्य यात्रा १९ एप्रिलला 

जोतिबा डोंगर - चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा प्रारंभ झाला. यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या उभ्या केल्या. मुख्य यात्रा १९ एप्रिलला होत असून  कामदा एकादशीपासून सुरुवात होईल.

दरम्यान, आज श्री जोतिबा देवाची सकाळी सरदारी राजेशाही थाटातील महापूजा बांधली. दुपारी बारा वाजता घोड्यावर बसलेली महापूजा बांधली. सकाळी निगवे दुमाला येथील हिंमतबहादूर चव्हाण-सरकार यांची मानाची सासनकाठी मिरवणुकीने दाखल झाली. ती मुख्य मंदिरात आल्यावर जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष झाला. गुलाल खोबऱ्याची उधळण केली.

रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, अरविरसिंह चव्हाण, महेंद्रसिंह चव्हाण, सुजय परदेशी, आकाश परदेशी, सुहास लटोरे, माजी सरपंच शिवाजीराव सांगळे, माजी उपसरपंच दत्तात्रय दादर्णे, ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते. हिम्मत बहादूर चव्हाण सरकार यांच्या सासनकाठीच्या मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढताना भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली. गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी, विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते गायली. बारा वाजता मुख्य मंदिरातील ज्योतिर्लिंग मंडपात केदारी उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले.

दरम्यान, निनाम पाडळी (ति. सातारा), विहे (ता. पाटण) कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव, (ता. कागल), किवळ तालुका कराड, छत्रपती करवीर कवठेगुलंद सांगली, मनपाडळे दरवेश पाडळी, (ता. हातकणंगले), सांगली, सातारा, सोलापूर, बार्शी पंढरपूर, लातूर आदी भागातील सासनकाठ्या उभ्या करून त्या त्या गावात यात्रेसाठी केव्हा जायचे याचे नियोजन केल्याचे सासन काठी प्रमुखांनी सांगितले.

दरम्यान, कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा यात्रेसाठी भाविक येण्यास सुरुवात होईल. कर्नाटक व बेळगाव भागातील भाविक दोन तीन दिवसात डोंगरावर येण्यासाठी बैलगाड्या घेऊन बाहेर पडतील. त्यांचे आगमन १५ एप्रिलला सकाळी नऊ वाजता डोंगरावर होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jotiba Dongar Chitra Yatra starts