‘चांगभलं’च्या गजरातच जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेचा प्रारंभ

निवास मोटे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

एक नजर 

  • श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा कामदा एकादशीच्या मुहूर्तावर प्रारंभ.
  • कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत.
  • यंदा मुख्य यात्रेदिवशी (ता. १९) गुड फ्रायडेची शासकीय सुटी आहे. त्यामुळे डोंगरावर मोठी गर्दी होण्याची शक्यता.
  • कामदा एकादशीनिमित्त श्री जोतिबा देवाची विठ्ठल रूपातील सालंकृत पूजा

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस जरी शुक्रवारी (ता. १९) असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे.

बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले चव्हाटा गल्ली, नार्वेकर गल्लीतील भाविक उद्या डोंगर चढतील. यंदा कामदा व भागवत या दोन एकादशी आल्यामुळे भाविकांत संभ्रम आहे. त्यामुळे यंदा काही भाविकांनी भागवत एकादशी धरली आहे. त्यामुळे डोंगरावर काही भाविकांचे ताफे आले. 

सकाळी आलेल्या भाविकांचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने स्वागत झाले. त्यांना विडा देण्यात आला, तर जोतिबाच्या मूर्तीची पंचारतीने ओवाळणी करण्यात आली. आज डोंगरावर सोलापूर, वरवंटी, आंबेजोगाई, बीड भागातील भाविक दाखल झाले. उद्याही पालखी व सासनकाठीसह या भागातील इतर भाविक दाखल होणार असल्याचे बीडच्या भाविकांनी सांगितले.

हलगी, पिपाणी, सनई व व्हलेर बाजा या वाद्यांच्या तालावर मंदिर परिसरात सासनकाठ्या नाचवण्यात आल्या. मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून भाविकांनी गुलाल, खोबऱ्याची उधळण केली. बेळगावच्या भाविकांनी मंदिर परिसरात ढोल व  कैताळ या वाद्यावर नृत्य करून चांगभलंचा जयघोष केला.

कामदा एकादशीनिमित्त श्री जोतिबा देवाची विठ्ठल रूपातील सालंकृत पूजा बांधली. आजपासून यात्रेस प्रारंभ झाल्याने येणारे भाविक डोंगरावर जागा निश्‍चित करत होते. भाविकांनी आडोसा म्हणून बैलगाडी व आपापल्या वाहनांशेजारीच तंबू ठोकले. काहींनी झाडांचा आधार घेतला. ग्रामपंचायतीने भाविकांना पाणी पिण्यासाठी मोठ्या  टाक्‍या स्वच्छ करून भरून ठेवल्या आहेत.

वाहतुकीत बदल...

  •  केर्ली व कुशिरे फाटामार्गे वाहने डोंगरावर
  •  इतर सर्व मार्ग वाहनांसाठी बंद 
  •  केर्ली-कुशिरेकडून येणारी वाहने गायमुखमार्गे मंदिराकडे
  •  एस. टी. बसेस व अत्यावश्‍यक वाहने दानेवाडीमार्गे मंदिराकडे
  •  परतीची वाहने गायमुखमार्गे केर्लीकडून खाली

पार्किंगची व्यवस्था - 
 केर्ली फाटामार्गे येणारी वाहने - यात्री निवाससमोर
 तलावाभोवती, दोनवडे क्रॉसिंग, जुने आंब्याचे झाड परिसर, शेवताई मंदिर परिसर, केर्ली हायस्कूल, गिरोली फाटा, तर गिरोली फाटामार्गे येणाऱ्या वाहनांना यमाई मंदिर परिसर, बुणे कॉर्नर पार्किंग, प्रेम लॉजिंग, निलगिरी बाग परिसरात दुचाकी व चारचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

१७ एप्रिलपासून अवजड वाहनांना बंदी
डोंगरावर जाणारी अवजड वाहने, ट्रक, तीनचाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्‍टर यांना १७ एप्रिलपासून यात्रा कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jotiba Dongar Chitra Yatra starts