"विजयध्वज' महानाट्याने रसिक मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या महानाट्यासाठी सुमारे 25 हजार रसिकांची उपस्थिती होती.

संगमनेर (नगर) ः व्यासपीठाच्या भव्यतेला साजेसे नेपथ्य. वेशभूषा, संगीत आणि ध्वनिसंयोजनाला लाभलेली दिमाखदार नृत्याविष्काराची साथ. व्यावसायिक अभिनेत्यांच्या तोडीचा अभिनय. महारथी अर्जुनाच्या जीवनावर आधारलेली कथाकल्पना... गीता परिवाराच्या महोत्सवाची सांगता करणाऱ्या "विजयध्वज' महानाट्याने संगमनेरकरांची मने जिंकली. 

स्थानिक पातळीवर ध्रुव ग्लोबल स्कूलच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या महानाट्यासाठी सुमारे 25 हजार रसिकांची उपस्थिती होती. गीता जयंती, तसेच स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गीता महोत्सवाच्या उत्तरार्धात हे महानाट्य झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज व गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित होते. 

 

हेही वाचा ःहक्काच्या नोंदीसाठी "ई-हक्क' प्रणाली

 

अर्जुनाच्या जीवनचरित्रातील विविध घटनांचा मागोवा घेणाऱ्या या महानाट्याची रचना स्थानिक पातळीवर केली होती. अप्रतिम सादरीकरणातून सुमारे अडीच तास प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची किमया या नाट्याने साधली. महानाट्यासाठी तीन रंगमंच उभारले होते. एका मंचावर महाभारताचे रचनाकार महर्षी व्यास जनमेजयाला महाभारताचे निरूपण सांगत होते. मुख्य रंगमंचावर महाभारतातील विविध प्रसंग सादर होत होते. तिसऱ्या रंगमंचावर मुख्य प्रसंगाची पार्श्‍वभूमी व नृत्य सादर केले जात होते. 

महाभारतातील विविध प्रसंग सादर 

महानाट्यात जनमेजयाचा नागयज्ञ, द्रौपदी स्वयंवर, अद्‌भुत मयसभा, अर्जुन व महादेवातील युद्धाचा प्रसंग, इंद्रसभेतील उर्वशीच्या शापाने बृहन्नडाचा वेश परिधान केलेला अर्जुन, त्याने निभावलेली राजकुमारी उत्तराच्या नृत्य प्रशिक्षकाची भूमिका, सेनापती कीचकाचा वध आणि कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धाप्रसंगी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला गीता उपदेश, असे विविध प्रसंग सादर झाले. 

 

हेही वाचा ः रेल्वेस्थानकात निर्जळी

 

लेखन, दिग्दर्शन महोपात्रा व डागा 

या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन व संगीत संयोजन खितीश महोपात्रा व गिरीश डागा यांनी केले. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी सोनाली महोपात्रा यांनी सांभाळली.त्यांना गंधर्व पलाई व विश्‍वजित देशमुख यांची मदत मिळाली. नेपथ्य सचिन जोशी, वेशभूषा कुलदीप कागडे, प्रफुल्ल भांडगे व राजू चौधरी,अनुराधा मालपाणी व प्राचार्य अर्चना घोरपडे यांनी महानाट्याच्या समन्वयाची भूमिका बजावली. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joyful with the 'Vijayadhvaja' play