सह्याद्रीतील वाघोबाला "कोरोना' कुंपण; जंगल पाळतंय "सोशल डिस्टन्स'

अजित झळके
शनिवार, 30 मे 2020

सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरीपर्यंत पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात भलतीच काळजी घेतली जातेय. तेथे माणूस आणि प्राणी यांच्यात सोशल डिस्टन्ससाठी विविध उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत. 

कोरोनाचं भय जगभर आहे. ते जमिनीवर आहे, तसं पाण्यातही आहे. सारा समुद्रही थांबलाय. तसंच ते जंगलातही आहे. प्राण्यांना कोरोना होतो की नाही, याबाबत अद्याप 100 टक्के स्पष्टता नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या योजना जंगलातही राबविल्या जाताहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरीपर्यंत पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात भलतीच काळजी घेतली जातेय. तेथे माणूस आणि प्राणी यांच्यात सोशल डिस्टन्ससाठी विविध उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या पाच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय, सुमारे 35 हून अधिक बिबट्या, शेकडो हरिण, काळवीट, सांबर, गवे, असंख्य प्रकारचे पक्षी, साप, साळींदर अशी प्राण्यांची गणती मोठी आहे. चार जिल्ह्यांत पसरलेल्या हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा परिसर यंदा पर्यटकांना आकर्षित करेल, असे नियोजन होते. कोरोना संकटामुळे ते फसले. पर्यटक फिरकण्याचा प्रश्‍नच आला नाही, मात्र या जंगलात असलेल्या शेकडो प्राण्यांना कोरोनासारख्या जागतिक संकटापासून दूर ठेवलं पाहिजे, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. 
या जंगलात वनरक्षक आणि वनमजुरांची संख्या 138 हून अधिक आहे. एकूण 46 कुट्यांमध्ये हे लोक राहतात. एका कुटीत एक वनरक्षक आणि दोन वनमजूर अशी विभागणी आहे. सांगली जिल्ह्यातील खुंदलापूर, वेळेदेऊरसह एकूण पाच गावे जंगल क्षेत्रात आजही आहेत. इथली लोकसंख्या फार मोठी नसली तरी माणसांचा वावर आहे. या साऱ्यात माणसांना विशेष अलर्ट करण्यात आले आहे. "मॅन वर्सेस वाईल्ड' हा संघर्ष इथे फार कमी होतो. प्राणी आणि माणसाचे जगणे एकमेकांसोबतच आहे. या एकमेकांसोबतच्या जगण्यावर यानिमित्त काही बंधने घालण्यात आली आहेत. ती आवश्‍यकच होती, असे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

पाणवठ्यांवर नियम 
जंगलातील पाणवठे हे प्राणी आणि मनुष्याचा वावर असणारे सामाईक ठिकाण आहे. येथे वन कर्मचारी आणि सामान्य लोकही जातात आणि रात्रीच्या वेळी प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. या पाणवठ्यांपासून माणसाने दूरच राहावे, असे सक्त आदेश आहेत. पाणवठ्यांवर हात-पाय धुवू नका, गरज असेल तरच पाणी घेण्यासाठी जा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

कुटीला बांबू कुंपण 
जंगलात एकूण 46 कुटी आहेत. तेथे लोक राहतात, जेवतात, खातात. उरलेले अन्न बाहेर टाकतात. हे अन्न खायला प्राणी येतात. तो संसर्गही टाळायचे नियोजन केले आहे. त्यासाठी सर्वच्या सर्व कुट्यांना बांबूचे कुंपण करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क आणि प्रत्येकाकडे सॅनिटायझरची सोय केली आहे. 

अन्नसाखळी लांबणीवर 
जंगलात वाघासह मांसाहारी प्राण्यांची संख्या वाढती आहे. साहजिकच, अन्न साखळी भक्कम करण्यासाठी सतत नियोजन करावे लागते. विशेषतः तृणभक्षक प्राणी म्हणजे हरिण, सांबर, काळवीट आदी जंगलात सोडावे लागतात. देशातील पहिल्या मानवनिर्मित सागरेश्‍वर अभयारण्यातून या प्राण्यांची सोय केली जाते. यावर्षी हे प्राणी मोठ्या संख्येने सह्याद्रीत सोडण्याचे नियोजन होते, मात्र कोरोना संकटाच्या धास्तीने नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे. तूर्त अन्न साखळीवर फार परिणाम झालेला नाही, मात्र तृणभक्षकांची संख्या वाढती ठेवणे गरजेचे असल्याने येत्या पावसाळ्यानंतर लगेच हे प्राणी सोडले जातील, असे श्री. मोहिते यांनी स्पष्ट केले. 

वाघाचे अस्तित्व दिसले 
मुख्य वनाधिकारी महादेव मोहिते यांनी सांगितले, ""गेल्या काही दिवसांत वाघाचे अस्तित्व जाणवत आहे. बफर झोन आणि कोअर झोनच्या सीमेवर वाघ येत आहेत. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याच्या हद्दीत हळवाक गावाजवळ विष्ठा सापडली. तिचे डीएनए परीक्षण करून घेतल्यावर ती वाघाचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या भागातील वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.'' 

जंगलात सर्व शिस्त पाळली जात आहे

स्थानिक रहिवासी लोकांना काम मिळावे, असे नियोजन केले आहे. शिवाय, परिसरात कीट वाटप, मास्क वाटप, सॅनिटायझेशन केले आहे. जंगलात सर्व शिस्त पाळली जात आहे.
- महादेव मोहिते, मुख्य वनाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jungle keeping "social distance"; good discipline in tiger project