इथं ठरली माणुसकीच भारी! : बेघर जखमी महिलेसाठी धावले इन्साफ फाउंडेशन

शैलेश पेटकर
Wednesday, 30 September 2020

कोरोना संकटकाळात जवळचे म्हणवणारे अंतर राखून राहत असताना, एका निराधार महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचे काम येथील इन्साफ फाउंडेशनने केले आहे.

सांगली : कोरोना संकटकाळात जवळचे म्हणवणारे अंतर राखून राहत असताना, एका निराधार महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचे काम येथील इन्साफ फाउंडेशनने केले आहे. कोल्हापूर रस्त्यावरील साधना पेट्रोल पंपाजवळील एका झुडुपात ही महिला वेदनांनी विव्हळत पडली होती. तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. सगळीकडे "दो गज की दूरी' अशी परिस्थिती असताना "माणुसकीच भारी' हे इन्साफच्या मुस्तफा मुजावर यांनी दाखवून दिले आहे. 

बेघर निराधांच्या मदतीसाठी धावणी सांगली इन्साफ फाउंडेशन संस्था आहे. लॉकडाउन काळापासून बेघरांना मदतीचा हात या संस्थेने दिला आहे. अनेक बेघरांना हक्काचा निवारा या संस्थेने दिला आहे. तसेच मृत झालेल्याचे शास्त्रशुद्धपणे अंत्यसंस्कारही संस्थेकडून केले गेले आहेत. कोल्हापूर रस्त्यावरील साधना पेट्रोल पंपाजवळील एका काटेरी झुडपात वेदनांनी विव्हळत एक महिला असल्याची माहिती शेजारी असणाऱ्यांनी शहर पोलिसांनी दिली. पोलिसांनी तातडीने इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना संपर्क साधला. मुस्तफाची टीम आणि पोलिस घटनास्थळी तातडीने धावले. एका अपार्टमेंटच्या मागे काटेरी झाडीत ही महिला ओरडत असल्याचे दिसून आले. मात्र त्याठिकाणी जाण्यासाठी मार्ग मिळत नव्हता. त्यातूनही इन्साफची टीम तिथे वाट काढत तिथे पोचली. 

गर्द काटेरी झुडुपात वेदनांनी विव्हळणाऱ्या त्या महिलेची अवस्था मन पिळवटून टाकणारी होती. तिच्या अंगात जागोजागी काटे रूतले होते. वेदनांनी ती मोठमोठ्याने ओरडत होती. तिला सुखरूप त्या जाळकांडातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. यावेळी "इन्साफ'चे निखिल शिंदे, सचिन कदम व सांगली शहर पोलिस ठाण्याचे अभिजीत माळी, अक्षय कांबळे आणि नागरिक उपस्थित होते. 

घर दिसून आल्यास संस्थेशी संपर्क साधा
एका महिला विव्हळत पडल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या उपस्थितीत आम्ही त्याठिकाणी गेलो. त्या महिलेस तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी इन्साफ फाऊंडेशन आणि सावली निवारा केंद्राकडून काम चालते. लॉकडाउनच्या काळात अनेकांना हक्काचा निवारा दिला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या आजीचे अत्यसंस्कारही संस्थेने केले. आपल्या परिसरात कोठे बेघर दिसून आल्यास संस्थेशी संपर्क साधावा. 
- मुस्तफा मुजावर, अध्यक्ष, इन्साफ फाऊंडेशन 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: justice Foundation runs to help homeless injured woman in sangali