
Jyotiraditya Scindia : विमानतळाबाबत ज्योतिरादित्य सकारात्मक; कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीला दिली ग्वाही
सांगली/इचलकरंजी : कवलापूर येथील १६० एकर जागेवर पुन्हा एकदा विमानतळ सुरु व्हावे. त्यासाठी ही जागा औद्योगिक विकास महामंडळाकडून विमान प्राधीकरणाच्या ताब्यात घ्यावी, अशी आग्रही मागणी विमानतळ बचाव कृती समितीने आज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.
त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल मागवतो, त्यानंतर पुढील कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली. जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा विषय यानिमित्ताने थेट याबाबतचे सर्वाधिकार असलेल्या केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हाती गेला आहे. त्यामुळे सांगलीकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सुरु असलेल्या लढ्यात आशादायक चित्र निर्माण झाल्याचा विश्वास कृती समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
श्री. ज्योजिरादित्य शिंदे आज इचलकरंजी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची भेट घडवण्यासाठी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी नियोजन केले होते. त्यावेळी कृती समितीचे सतीश साखळखर, हणमंतराव पवार, उमेश देशमुख, महेश पाटील, डॉ. संजय पाटील, तानाजी सरगर, आनंद देसाई यांनी त्यांची भेट घेतली.
सांगली विमानतळाचा विषय महत्वाचा असल्याने दोनवेळा या शिष्टमंडळाची त्यांच्याशी चर्चा झाली. श्री. शिंदे यांनी ‘मला विषय लक्षात आला आहे, मी सविस्तर अहवाल मागवून घेतो. त्यानंतर पुढे कार्यवाही करूयात’, अशी ग्वाही त्यांना दिली.
कृती समितीने त्यांनी एक निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की कवलापूर विमानतळाच्या १६० एकर जागेचा बाजार चाललेला आहे. तो ताबडतोब थांबवण्यात यावा. कवलापूर येथे आधी विमानतळ होते. येथे विमाने येत-जात होती. काळाच्या ओघात ते बंद झाले.
तेथे पुन्हा विमानतळ सुरु करणे संयुक्तिक आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी ते महत्वाचे आहे. आता जुना अहवाल बाजूला ठेवावा आणि नव्याने येथे सर्वेक्षण करावे. येथील शेतकरी विमानतळासाठी जागा द्यायला तयार आहेत. भूमीसंपदासाठी आता विरोध राहिलेला नाही. गावचे लोक या विकासाला साथ देणार आहेत. त्याबाबत सरकारी पातळीवर शेतकऱ्यांशी संवाद साधावा. त्यात आम्हीही सहभागी होऊ.’’
‘‘नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची आज दोनवेळा भेट झाली. आधी त्यांनी थोडक्यात विषय समजून घेतला, दुसऱ्या भेटीत त्यांना अधिक सविस्तर माहिती देता आली. त्यांनी याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. या विषयाला आता चालना मिळाली आहे. या प्रयत्नात आता खासदार, आमदारांनी पुढे येऊन मदत करावी. या जागेवर झाले तर विमानतळच होईल, ही जनभावना आहे. त्याचा आदर करावा.’’
- सतीश साखळकर, विमानतळ बचाव कृती समिती