बिटरगावची मुलं हुश्शार! कबड्डीसाठी केले मैदान तयार!!

अशोक मुरुमकर
Friday, 13 September 2019

सोलापूर : सैराट सिनेमाच्या सुरुवातीचे बिटरगावचे क्रिकेटचे मैदान तुम्हाला आठवते का? आपल्या फलंदाजीने हेच मैदान परश्या गाजवतो आणि आर्चीच्या भावविश्वात प्रवेश करतो. याच बिटरगावच्या (वांगी) शेजारी असलेल्या बिटरगावाला (श्री) खेळाचे मैदानच नाही. त्यामुळे कबड्डीचा छंद लागलेल्या गावातील शाळकरी मुलांनी स्वत:च गावाशेजारी मेहनत करून मैदान बनवले आहे. आणि आपला कबड्डीचा संघ अव्वल व्हावा म्हणून तिथे कसून सरावही सुरू केला आहे. अर्थात आपल्याला गावातच चांगले मैदान मिळावे, अशी अपेक्षा ही मुले व्यक्त करत आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, दोन वर्षांपूर्वी गावातील नेहरू युवा मंडळ आणि यशकल्याणी सेवाभावी संस्थेने गुरुकुल स्कुल येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा घेतल्या होत्या. त्यात या बिटरगावचा पराभव झाला होता. क्रीडांगण नसल्याने आपल्याला सराव करता आला नाही. केवळ त्याचमुळे आपला पराभव झाल्याची खंत गावातील मुलांमध्ये निर्माण झाली. क्रीडांगण नाही हे कारण आता सांगायचे नाही तर, आहे त्या परिस्थितीतच आपण यश मिळवायचे, असे ठरवून कबड्डीचा संघ तयार करायचा निर्धार या मुलांनी केला. कसून सराव करायचे ठरले.

पण, गावात त्यासाठी मैदानच नव्हते. मग त्यांनी गावाबाहेर दोन किलोमीटरवर एक जागा शोधली. कुदळ, फावड्याने साफसूफ करून या जागेचे त्यांनी मैदानात रुपांतर केले. आता ही सर्व मुले पहाटे साडेचार वाजता या ठिकाणी जातात. बॅटरीच्या उजेडात सकाळी सात वाजेपर्यंत कबड्डीचा सराव करतात आणि नंतर शाळेला जातात.करमाळा-जामखेड रस्त्यावर बिटरगाव (श्री) हे एक हजार लोकसंख्येचे गाव आहे. सीना नदीच्या काठावर असलेल्या या गावात क्रीडांगण नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पीक निघाल्यानंतर मुले शेजारील शेतात क्रिकेट खेळतात. मात्र, पाऊस पडल्यानंतर त्यांना खेळायला जागा मिळत नाही. गावात व्यायामशाळा असूनही ती केवळ दुर्लक्षामुळे बंद पडली आहे.

याबाबत विद्यार्थी राम शेळके म्हणाला, गावात क्रीडांगण नसल्याने खेळायची इच्छा असूनसुध्दा कबड्डी खेळता येत नाही. आम्हाला आमचा संघ तयार करायचा आहे. ओंकार जाधव म्हणाला, गावात क्रीडांगण असते तर आम्हाला जीव धोक्यात घालून खेळण्यासाठी दूर येण्याची वेळ आली नसती. आम्हाला गावातच क्रीडांगण उपलब्ध करून दिले गेले पाहिजे.

गावापासून दोन किलोमीटरवर बिटरगाव (श्री) फाटा आहे. येथे करमाळा-जामखेड रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या जागेत मुलांनी क्रीडांगण तयार केले आहे. १० ते १५ जणांनी दररोज एकत्र येऊन तेथील गवत काढले. टिकाव, खोरे आणि पाटीच्या सह्याने त्यांनी खड्डे बुजवले. आता दररोज पहाटे अंधारात चालत येऊन ते कबड्डीची तयारी करत आहेत. अंधारात चिंचेच्या झाडाला बॅटरी बांधून ते कबड्डीचा सराव करतात. सकाळी ७ वाजेपर्यंत सराव करून ८.३० च्या एसटी बसने पुन्हा करमाळ्याला शाळेत जातात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kabaddi players creat their own play ground