esakal | 'कडकनाथ' हा कंत्राटी शेतीतील लुटीचा नमूना; राजू शेट्टी यांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Kadaknath is a pattern of looting in contract farming; Criticism of Raju Shetty

कडकनाथ घोटाळा हा कंत्राटी शेतीपूरक व्यवसाचा शेतकऱ्यांना लुटण्याचा नमुना आहे. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

'कडकनाथ' हा कंत्राटी शेतीतील लुटीचा नमूना; राजू शेट्टी यांची टीका

sakal_logo
By
शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : मी कुणाची सुपारी घेऊन बोलत नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठीच बोलत आहे. बाजार समित्या टिकल्या तरच सामान्य शेतकरी टिकणार आहे. कंत्राटी शेतीत शेतकरी गुलाम बनेल. शेतीची अक्कल नसणारे, शेतात काय पिकते हे माहीत नसणारे या कायद्याचे समर्थन करीत आहेत. कडकनाथ घोटाळा हा कंत्राटी शेतीपूरक व्यवसाचा शेतकऱ्यांना लुटण्याचा नमुना आहे. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे केंद्रसरकारच्या कृषी कायद्याविरोधात आयोजीत केलेल्या सभेत शेट्टी बोलत होते. राज्याचे प्रवक्ते धैर्यशील पाटील, सांगली जिल्हा पक्षाध्यक्ष महेश खराडे, सांगली जिल्हा संघटना अध्यक्ष पोपट मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, राज्य प्रवक्ते समसुद्दिन संदे, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव येडेमच्छिंद्रचे मानसिंग पाटील हणमंत पाटील यांची उपस्थिती होती. 

शेट्टी अदानी-अंबानीसाख्या उद्योजकांनी निवडणुका जिंकण्यासाठी पुरविलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठीच नव्या कृषी कायद्यांची शेतकऱ्यांची मागणी नसताना निर्मिती केली आहे. कोरोनाची सबब पुढे करीत हिवाळी अधिवेशन रद्द केले. संसदीय परंपरा मोडीत काढून हा कायदा शेतकऱ्यांवर लादला आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी देशपातळीवर व्यापक लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, केंद्रातील सरकारने अन्नधान्याचा किमान हमी भाव काढला आहे. त्यामुळे ऊसाचाही एफआरपी ते केव्हाही काढू शकतात. वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, मधुकर पाटील, संतोष शेळके, मधुकर डिसले, प्रकाश देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

एकरकमी एफआरपीच.. 
शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतपत कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. एफआरपी पेक्षा कमी भाव देणाऱ्या मस्तवालांची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही. नव्या वर्षाच्या सुरवातीस हरामखोरांचे पुतळे जाळून स्वाभिमानीचा हिसका दाखवू 

मी फकीर माणुस... 
ईडी सारखी पीडा मागे लागेल म्हणून नव्या कायद्यास विरोध करण्याचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीत नैतिक बळ नाही. मी फकीर माणूस कुणाच्या बापाला घाबरत नाही, देशपातळीवर कायद्या विरोधात लढणार असे शेट्टी म्हणाले. 

कडकनाथ घोटाळा... 
सत्तर रुपयास कोंबडीचे अंडे घेतो म्हणणाऱ्यांनी चारशे ते पांचशे कोटी रुपयांचा घोटाळा करुन शेतकऱ्यांचे पैसे बुडविले. यात पोलीसांनीही गुंतवणूक केली. पैसे खाणारे पोलीसही आपणास माहित आहेत. पैसै परत मिळविण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे शेट्टींनी सुतोवाच केले.

संपादन : युवराज यादव

loading image