कडेगाव नगरपंचायत वार्तापत्र : वेध स्मार्ट सिटी बनण्याचे

संतोष कणसे
Saturday, 23 January 2021

कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची संधी आहे.

कडेगाव (जि. सांगली) : कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची संधी आहे. त्या संधीचे सोनं करण्याची इच्छाशक्ती कारभाऱ्यांनी ठेवली तर कडेगाव शहर निश्‍चितच स्मार्ट सिटी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी कारभाऱ्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

कडेगाव ही डॉ. पतंगराव कदम यांची राजधानी.त्यांनी आपल्या मंत्रीपदाच्या पंधरा वर्षाच्या दीर्घ कालखंडात कडेगावला तालुक्‍याचा दर्जा दिला येथे शैक्षणिक व सहकारी आदी विविध संस्थांची उभारणी करुन कडेगावच्या विकासात मोलाचे योगदान दिले. तर त्यानंतर आता पतंगराव कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हेही कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत.

परंतु नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास आराखडा तयार होणे गरजेचे आहे, तो झाला तर डॉ. कदम यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून नगरपंचायतीला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळू शकतो. त्यातून शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो.

परंतु सत्ताधारी कॉंग्रेस पक्षामध्ये एकवाक्‍यता नसल्याने त्याचा शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे.तसेच नगरपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील संबंधही सलोख्याचे नाहीत.तर कोरोना काळ असतानाही येथील मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता.अशा रीतीने अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील संबंध ताणले गेले तर त्याचा शहराच्या विकासावर परिणाम हा होणारच. ग्रामपंचायतीची जेव्हा नगरपंचायत झाली तेव्हा लोकांना शहर स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला येईल असे वाटले होते.

परंतु गेल्या चार वर्षात नगरपंचायतीने जेवढा विकासाचा टप्पा पुर्ण करणे गरजेचे होते तेवढा पुर्ण झाला नाही. तर आता येत्या सात ते आठ महिन्यात नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक होणार आहे.तर अजूनही नगरपंचायतीच्या कारभाऱ्यानी शहर विकासाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो. 
तेव्हा संपुर्ण कडेगाव शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करुन त्याप्रमाणे विकास करावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadegaon Nagar Panchayat Newsletter : aboyt to become a smart city