esakal | कडेगाव तालुक्‍यात ऊसावर लोकरी माव्याचा घाला
sakal

बोलून बातमी शोधा

In Kadegaon taluka sugarcane attacked by lokari mava

कडेगाव (जि. सांगली ) तालुक्‍यात अनेक ठिकाणच्या परिसरात ऊस पिकावर मोठया प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

कडेगाव तालुक्‍यात ऊसावर लोकरी माव्याचा घाला

sakal_logo
By
संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली ) : तालुक्‍यात अनेक ठिकाणच्या परिसरात ऊस पिकावर मोठया प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. 

कडेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.परंतु टेंभू-ताकारी सिंचन योजनेमुळे तालुक्‍याचे सध्या नंदनवन झाले आहे.तालुक्‍याचे एकूण 58 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे 45 हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे.यापैकी जवळपास 20 हजार हेक्‍टर क्षेत्रात ऊसाचे पीक आहे.तर 21 हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरीपासह अन्य पिके आहेत. 

तर तालुक्‍यात अनेक ठिकाणी ऊसावर मोठया प्रमाणात लोकरी माव्याची कीड आली असून, तिचा प्रसार झपाटयाने वाढत आहे. लोकरी माव्याने उसाची पाने पांढरी तर, वाडे काळे पडले आहेत. ही कीड उसातील हरितरस शोषून घेत असल्याने उसाची वाढ खुंटत आहे.शेतीतील नवीन तंत्रज्ञान, पाण्याची अपेक्षित उपलब्धता यामुळे कडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. या उसाला लोकरी माव्याने विळखा घातला असल्याने मोठया आर्थिक हानीची भीती व्यक्त होत आहे. 

तालुक्‍यात ऊसाचे क्षेत्र उच्चांकी असून तालुक्‍यातील व परिसरातील ऊस डॉ पतंगराव कदम सोनहीरा साखर कारखाना , क्रांती कारखाना , सह्याद्री कारखाना ,केन ऍग्रो कारखाना ,उदगीरी कारखाना , गोपूज कारखाना आदी कारखान्यांना गळपासाठी जातो.

यावर्षी तालुक्‍यात सुमारे 20 हजार हेक्‍टर ऊस क्षेत्र आहे. हा ऊस गळीत करण्यासाठी साखर कारखाने सज्ज असतानाच, उसावर लोकरी माव्याचे संकट ओढवले आहे. ढगाळ हवामानामुळे लोकरी मावा मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्यातच उसाची पूर्ण वाढ झाल्याने त्यावर औषध फवारणी करणेही अवघड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रोगावर कृषी विभागाने पर्याय काढून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे बनले आहे. 

संपादन : युवराज यादव