कोरोनामुळे कडेगावकर यंदा करणार साधेपणाने गणेशोत्सव 

संतोष कणसे 
Wednesday, 12 August 2020

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे.

कडेगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. तर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक गणपती उत्सव देखील न करण्याचा एकमुखी निर्णय पोलीस, ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळांच्या बैठकीत झाला. 

कोरोना विषाणूंची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण या काळात प्रत्येक सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहेत.तसाच यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करूयात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. या आवाहनास गणेश मंडळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला . कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस व चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या उपस्थितीत कडेगाव शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व नागरिकांची बैठकी संपन्न झाली.या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय झाला.

पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस म्हणाले,दरवर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.मात्र, यंदा आपण करोनाच्या संकटाचा सामना करीत असून करोनासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजाराची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. हे लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करूयात, गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.त्याचबरोबर गणेशमूर्तीचे विसर्जनही साधेपणाणे करावे, असे आवाहन देखील हसबनिस यांनी यावेळी केले.

सार्वजनिक जागेत कोणीही गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही व मंडप उभारणार नाही.गणेश मूर्तीची उंची 4 फुटापर्यतच असेल.शाडू मातीच्या व पर्यावरण पूरक मूर्ती असतील.ध्वनिक्षेपकचा वापर होणार नाही.मिरवणुक होणार नाही.प्रशासनाच्या सूचनांचे पालन होईल.आरती करताना जास्तीत जास्त पाच लोकांची उपस्थितीती असे निर्णय यावेळी बैठकीत सर्वानुमते घेण्यात आले. 

या गावात एक गाव एक गणपती 
तालुक्‍यातील नेवरी,अंबक,मोहिते वडगाव,देवराष्ट्रे,चिंचणी, शिरगाव,शिवणी,तडसर यासह आदी गावामध्ये 
एक गाव एक गणपतीचा एकमुखी निर्णय झाला.तर तालुक्‍यातील कडेपुर,सासपडे यासह आदी गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadegaonkar will simply celebrate Ganeshotsav