आग्रही होऊया...

कालिदास पाटील (मानसतज्ज्ञ)
रविवार, 7 मे 2017

‘तुझं माझं जमेना... तुझ्याशिवाय करमेना’ अशी राधा, मीरा आणि रवी यांची मैत्री. गळ्यात गळे घालून फिरणाऱ्या या मैत्रीत कुठे माशी शिंकते हेच कळत नाही आणि बघता बघता एकमेकांना नाके मुरडणे सुरू होते; पण तेही अगदी तात्पुरते. राधाचा स्वभाव बडबडा, येता जाता मनमोकळ्या गप्पा मारणारा, कोणाशीही अंतर ठेवून न वागता गंमत जंमत करणारा, मीरा नेहमी अंतर्मुख कामापुरते बोलणारी, चार हात लांब राहणारी, मनातलं काही न सांगता रिंगणाबाहेर मैत्री न करणारी. रवी मात्र जिथे जातो तिथला होतो. त्याला कोणाचेच वावडे नसते. साऱ्यांनाच तो हवा-हवासा वाटतो, नवनवीन युक्‍त्या शोधतो. हातात घेतलेले काम परफेक्‍ट करतो.

‘तुझं माझं जमेना... तुझ्याशिवाय करमेना’ अशी राधा, मीरा आणि रवी यांची मैत्री. गळ्यात गळे घालून फिरणाऱ्या या मैत्रीत कुठे माशी शिंकते हेच कळत नाही आणि बघता बघता एकमेकांना नाके मुरडणे सुरू होते; पण तेही अगदी तात्पुरते. राधाचा स्वभाव बडबडा, येता जाता मनमोकळ्या गप्पा मारणारा, कोणाशीही अंतर ठेवून न वागता गंमत जंमत करणारा, मीरा नेहमी अंतर्मुख कामापुरते बोलणारी, चार हात लांब राहणारी, मनातलं काही न सांगता रिंगणाबाहेर मैत्री न करणारी. रवी मात्र जिथे जातो तिथला होतो. त्याला कोणाचेच वावडे नसते. साऱ्यांनाच तो हवा-हवासा वाटतो, नवनवीन युक्‍त्या शोधतो. हातात घेतलेले काम परफेक्‍ट करतो. त्यामुळे तुटणाऱ्या मैत्रीचा पूल बांधण्याचे रवी नेहमीच काम करतो.

काही वेळा आपण इतरांशी मैत्री जोडताना स्वतःलाच विसरून जातो. स्वतःचे अस्तित्व नाकारतो. समतोल विचार करता येत नाही. छोट्या-छोट्या अडचणींमध्ये निर्णय घेता येत नाही, की घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही. दुसऱ्याच्या मताप्रमाणे आपण वागायला लागलो, की लोक आपल्याला ‘सांग काम्या ओ नाम्या’ म्हणून हिणवतात. ‘आपण असेच आहोत’ म्हणून कधी कधी अकारणच स्वतःला कमी लेखतो. इतरांच्या साऱ्या गोष्टी आपणाला आवडतात; पण आपणच केलेले काम आपणाला चुकीचे वाटते. स्वतःला कमी लेखण्याच्या या स्वभावामुळे आपण प्रत्येक ठिकाणी पुढे जाण्याऐवजी माघार घेण्याचा प्रयत्न करतो. स्वतःबद्दल निश्‍चित कल्पना नसल्याने लोक आपणाला दुबळे समजतात. साहजिकच खेळ, प्रकल्प, गटकार्य अशा सर्व ठिकाणी आपण राखीव गडी होतो. आपल्या मनातले विचार, भावना इतरांना न दुखावता स्पष्टपणाने मांडणे म्हणजे इतरांना कमी लेखणे असे नव्हे. आपल्या आग्रही स्वभावामुळे आपण ठरविलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोचणे सहज शक्‍य होते. कारण तो आपला मानसिक कणखरपणा असतो. क्षमता असूनही प्रत्येक ठिकाणी सावधगिरीने वागणाऱ्या मुलांमध्ये निष्क्रियता असते. या निष्क्रिय मुलांमध्ये भावनिक उदासीनता येते. प्रत्येक ठिकाणी स्वतःची अवहेलना केल्याने त्यांना लोकांची, परिस्थितीची भीती वाटते. परावलंबी जगणे आणि दुबळ्या स्वभावामुळे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ही मुलं अनेकदा खोटे-नाटे वागतात, किंबहुना भविष्यात स्वतःला वाचविण्यासाठी वाईट कृत्यात, हिंसक वागण्यात सहभागी होतात. याउलट आग्रही मुलं आपल्या विवेकशील विचाराने राग, लोभ, मत्सर या भावनांवर योग्य नियंत्रण ठेवतात. ही मुलं स्वभावतःच प्रेमळ आणि सभ्य असतात. ती प्रसंगानुरूप स्पष्ट बोलतात हे खरे; पण त्यांचे बोलणे अपमानकारक किंवा झोंबणारे नसते. त्यामुळे त्यांच्या आग्रहीपणालाही इतरांकडून पाठिंबा किंवा सहकार्य मिळते. आग्रही मुलं ही नम्र असतात. ती सहसा गर्वाने कॉलर ताठ करत नाहीत. नेहमी उत्साही राहतात. इतरांच्या गरजेला धावून जातात. त्यामुळे त्यांचा संबंध नेहमीच स्नेहपूर्ण राहतो.

आपले बोलणे, वागणे, व्यक्त होणे हे सारे आपल्या स्वतःविषयीच्या समजुतीवर आधारित असते. आपले वागणे आग्रही होण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टीबाबत पाल्हाळीक स्पष्टीकरणाशिवाय स्पष्टपणाने बोलायला हवे. आपणाला न आवडणाऱ्या गोष्टींना अपराधीपणाशिवाय नाही म्हणता यायला हवे. इतरांच्या विनवणीचा केवळ भावनिक विचार न करता आपल्या निर्णयावर ठाम राहायला  हवं, तसेच इतरांनी केलेल्या वास्तव स्तुतीचाही स्वीकार करायला हवा. आपल्या कमतरतेवर बोट ठेवून कोणी टीका केली तर त्याला प्रतिकार न करता सकारात्मक विचार करायला हवा, अन्‌ इतरांकडून मिळालेला अभिप्राय दिशादर्शक म्हणून वापरता यावा.

दिवसाकाठी आपण जशी आपल्या आवडीची कामे करतो, आपणाला हवे तसे जगतो तसेच आपणाला न आवडणाऱ्या, कंटाळवाण्या गोष्टींनाही आपण बळी पडतो. ते केवळ आपल्या भिडस्थपणामुळेच. भिडेपोटी नको असणाऱ्या गोष्टीत आपला वेळ गेल्याने हवे ते उद्दिष्ट गाठण्यात आपणाला अडथळे प्राप्त होतात. म्हणूनच आपणाला न पटणारी, आनंद न देणारी कामं आपणाला नम्रपणे टाळता यायला हवीत. स्वार्थी न होता, इतरांचे नुकसान न करता, इतरांच्या भावना न दुखावता स्वतःचा आनंद मिळवणं हेच आग्रही व्यक्तीचं प्रमुख लक्षण आहे. इतरांप्रमाणेच स्वतःलाही स्वीकारणे, चांगले वागविणे हा आपला हक्क आहे. म्हणूनच आपल्या विचार, भावना अन्‌ कृतींचा ताबा इतरांच्या हाती न सोपवता आपण स्वतःच आग्रही सूत्रधार होऊया. त्यासाठी

  •  स्वआदर वाढवूया, नकारघंटा थांबवूया.
  •  इतरांच्या मतांचा नि:स्वार्थ स्वीकार करूया.
  •  स्पष्टपणे निर्णय घेऊया. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहूया.
  •  सकारात्मक नातेसंबंधांची जोपासना करूया.
  •  आपल्या वागण्याविषयी इतरांकडून अभिप्राय घेऊया.
Web Title: kalidas patil write article in SmartSobati