कर्नाटकात जायचं आहे तर मग 'सेवा सिंधू'वर करा नोंदणी ...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

मनोजकुमार नाईक : सीमा नाक्यावरील नियमात बदल

कोगनोळी (बेळगाव) :  सीमा तपासणी नाक्यारुन कर्नाटकात प्रवेशाच्या नियमात आजपासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सेवा सिंधू ॲपवर नोंदणी असल्यास कोणत्याही राज्यातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोज कुमार नाईक यांनी दिली.

कोगनोळी येथील सीमा तपासणी नाक्यावर बाहेरील राज्यातून आलेल्या प्रवाशांची सेवा सिंधू ॲपवर दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. या आधी सेवा सिंधू ॲपवर नोंदणी असूनही ज्या-त्या जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय प्रवाशांना सोडण्यात येत नव्हते. त्यामध्ये देखील आता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कर्नाटकात प्रवेश करायचा असल्यास केवळ सेवा सिंधू ॲपवर नोंदणी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर अशा लोकांना प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा- कोल्हापुरात आजपासून हे राहणार सुरू अन् हे राहणार बंद... -

परराज्यात जाणाऱ्या प्रवासी वर्गासाठीही वेगळी सोय केली आहे. त्यांच्या हातावर परराज्यात जात असल्याबाबतचा शिक्का मारण्यात येणार आहे. शेवटच्या तपासणी नाक्यावर या लोकांच्या हातावर शिक्का असल्याची तपासणी करून त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यात येणार असल्याचे उपाधीक्षक नाईक यांनी सांगितले.यावेळी निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, एएसआय एस. ए. टोलगी यांच्यासह अधिकारी, पोलिस उपस्थित होते.

'लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. त्यानुसार सीमा तपासणी नाक्यावरील नियमात बदल झाला आहे. आता सेवा सिंधू ॲपवर नोंदणी असल्यास प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश मिळणार आहे.'

-मनोजकुमार नाईक, पोलिस उपाधीक्षक, चिक्कोडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka if registered on Seva Sindhu app then entry in karnataka