esakal | महाराष्ट्र - कर्नाटकातील नेत्यांचे असेही फॅमिली कनेक्शन...
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Maharashtra leader's family relationship marathi news

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा सीमावाद जरी पेटता असला तरी या दोन राज्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दोन्ही राज्यातील अनेक नेत्यांचे नातेसंबंध असले तरी सीमा प्रश्न मात्र 'जैसे थे' च आहे.

महाराष्ट्र - कर्नाटकातील नेत्यांचे असेही फॅमिली कनेक्शन...

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव - भाषावाद व सीमावाद सोडला तर उत्तर कर्नाटक व पश्‍चिम महाराष्ट्राच्या लोकजीवनात कमालीचे साम्य आहे. त्यामुळे बेळगाव, कारवार, विजापूर या जिल्ह्यांचे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. 

बेळगावातील राजकीय नेत्यांचे महाराष्ट्र कनेक्‍शन

बेळगाव जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार व खासदार व माजी मंत्र्यांची सासरवाडी महाराष्ट्रात आहे. तर महाराष्ट्रातील काही आमदार व माजी मंत्र्यांची सासरवाडी बेळगाव, विजापूर जिल्ह्यात आहे. विद्यमान आमदार, खासदार व मंत्र्यांबाबत माहिती घेतल्यास बेळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्र कनेक्‍शन सर्वाधिक असल्याचे आढळून येते. सध्या सीमाभागात सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्याना कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. ते आलेच तर त्याना अटक करून महाराष्ट्राच्या हद्दीवर सोडले जात आहे. अशा स्थितीत बेळगावातील राजकीय नेत्यांचे महाराष्ट्र कनेक्‍शन चर्चेत आले आहे.

वाचा - मराठीद्वेष्ट्या मंत्र्यांमुळेच सीमा भागातील मराठी गोत्यात...

नेत्यांच्या सासरवाडीची अशी ही गंमत

2005 साली एन.धरमसिंग हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. ते महाराष्ट्राचे जावई असल्याने सीमाप्रश्‍नाच्या अनुषंगाने त्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. त्याचवेळी विजयसिंह मोहीते-पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांची सासरवाडी चिकोडी तालुक्‍यातील मांगूर हे गाव. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे 'सासर' चर्चेत आले होते. माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांची सासरवाडी गडहिंग्लज तालुक्‍यातील महागाव हे गाव आहे. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राशी घनिष्ठ संबंध आहे. पोटनिवडणूकीत विजयी झाल्यानंतर लागलीच त्यानी कोल्हापूरला जावून देवी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांची सासरवाडी पुणे, त्यामुळे त्यांचेही महाराष्ट्राशी व तेथील राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके व खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर मूळचे महाराष्ट्रातील आहे. आमदार बेनके यांचे गाव चंदगड तालुक्‍यातील माणगाव, तर डॉ. निंबाळकर या नागपूरच्या. पण कर्नाटकात आमदार होण्याचे कर्तृत्व त्यांच्या नावावर आहे. बेळगाव ग्रामीणमधून दोनवेळा आमदार झालेले संजय पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी गावचे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांची सासरवाडी सांगली आहे. सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी हे कोल्हापूरचे जावई आहेत. त्यामुळे या दोहोंचा महाराष्ट्राशी नियमितपणे संबंध येतो.

पुढारी जावाई मात्र कन्नड-मराठी वादापासुन दूर

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे राजकीय सचिव असलेले शंकरगौडा पाटील हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील इंडी गावचे, पण त्यांची सासरवाडी सोलापूर आहे. माजी मंत्री व हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती हे सुद्धा महाराष्ट्राचे जावई आहे. ते मिरज तालुक्‍यातील मालगावचे जावई आहेत. सावंतवाडीचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर हे बेळगावचे जावई आहेत. त्यामुळे यापैकी बहुतांश जण कधी कन्नड-मराठी वादात सापडलेले नाहीत हे विशेष. 
 

loading image
go to top