Belgaum : महाराष्ट्रात बसेस सोडण्याची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ksrtc
महाराष्ट्रात बसेस सोडण्याची तयारी

Belgaum : महाराष्ट्रात बसेस सोडण्याची तयारी

बेळगाव : कर्नाटक परिवहनच्या नजरा महाराष्ट्रातील परिवहन कर्मचारी आंदोलनाकडे लागून राहिल्या आहेत. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल सक्ती मागे घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक वायव्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रात आंदोलन मागे घेताच कर्नाटकातून महाराष्ट्रात बसेस धावणार आहेत.

चिक्कोडी, बेळगाव विभागातून रोज १९० बसेस महाराष्ट्रात ये-जा करतात. पण फेब्रुवारी मध्यापासून दोन्ही राज्यांच्या आंतरराज्य बससेवेवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरियंट’ हा नवा कोरोना विषाणू सापडल्याने फेब्रुवारी २०२१ पासून कर्नाटकाने महाराष्ट्रातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केला होता. त्यामुळे महाराष्ट्र परिवहनने कर्नाटकातील आपली बससेवा थांबवली होती. केवळ कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात धावत होत्या. पण दुसरी लाट आल्याने मार्च महिन्यापासूनच संपूर्ण बससेवा विस्कळीत झाली. कोरोना संसर्ग कमी झाल्याने पुन्हा बससेवा सुरू झाली. पण चाचणी अहवालाच्या सक्तीमुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवाशीच आले नाहीत. रोज केवळ ६ बसेस कर्नाटकातून पंढरपूर, सोलापूर, शिर्डी, पुणे, आणि मुंबई येथे बसेस धावत होत्या.

त्यातच महाराष्ट्रात परिवहन कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यापासून आंदोलन छेडले आहे. त्यामुळे या बसेस देखील धावणे बंद झाले आहे. ९ नोव्हेंबरला कर्नाटकाने कोरोना चाचणी अहवालाची सक्ती मागे घेत नियम शिथिल केल्याने परिवहन मंडळाने देखील महाराष्ट्रात पूर्णक्षमतेने बससेवा सुरू करण्यासाठी आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत.

बेळगाव विभागातून रोज ९२ तर चिक्‍कोडी विभागातून ९८ बसेस महाराष्ट्रात धावतात. महाराष्ट्रातील चंदगड आणि कोवाड भागात कर्नाटक परिवहनच्या बसेसना प्राधान्य दिले जाते. त्यामानाने महाराष्ट्रातून कोल्हापूर मार्गे केवळ ७८ बसेस कर्नाटकात येतात. कर्नाटक परिवहन मंडळालाच या आंतरराज्य सेवेतून अधिक फायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संप कधी मिटेल याकडे कर्नाटक परिवहनचे लक्ष आहे. कर्नाटक परिवहनला महाराष्ट्रातील बसेस बंद असल्याने रोज लाखो रुपयांचा नुकसान सोसावा लागत आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी

बेळगावातून चंदगड, कोवाड आणि कोल्हापूर अशाही बसेस सोडल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील कर्मचारी आंदोलन मागे घेताच बससेवा सुरळीत होणार असून आंतरराज्य प्रवाशांना असलेल्या अडचणी देखील दूर होणार आहेत.

महाराष्ट्रातील संप सुटण्याची प्रतीक्षा केली जात आहे. संप मागे घेताच पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू केली जाणार आहे. फेब्रुवारीपासून बसेस पूर्ण क्षमतेने धावलेल्या नसल्याने मंडळाने नुकसान सोसावे लागत आहे.

- के. के. लमाणी, परिवहन वाहतूक नियंत्रण अधिकारी

loading image
go to top