सर्कल "साहेबांचा प्रोटोकॉल'च न्यारा 

युवराज पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोल्हापूर - "करवीर'च्या सर्कल मंडळीचा "प्रोटोकॉल' कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांसाठी सध्या चांगलाच महागात पडू लागला आहे. डायरी घालण्यासह अन्य कुठल्याही कामासाठी गेलात तर "साहेबांच्या प्रोटोकॉल'चे काय, असा थेट सवाल केला जात आहे. 

कोल्हापूर - "करवीर'च्या सर्कल मंडळीचा "प्रोटोकॉल' कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांसाठी सध्या चांगलाच महागात पडू लागला आहे. डायरी घालण्यासह अन्य कुठल्याही कामासाठी गेलात तर "साहेबांच्या प्रोटोकॉल'चे काय, असा थेट सवाल केला जात आहे. 

"साहेबांनी' या कामासाठी पी.ए.ची नियुक्ती केली आहे. कामाचे स्वरूप कसे आहे, यावर "प्रोटोकॉल'चा दर निश्‍चित आहे. एखाद्या मिळकतीविषयी तक्रार असेल आणि तशी हरकत घेतली असेल तर ज्याच्या विरोधात हरकत आहे, त्याचे काही खरे नाही. तक्रारदार हरकत मागे घ्यायला स्वेच्छेने तयार झाला तरी सहजासहजी प्रकरण मिटविले जात नाही. प्रोटोकॉल पूर्ण केला की काम मार्गी लागण्यात अडथळा येत नाही. मात्र प्रोटोकॉल पूर्ण होत नाही, तोपर्यंत डायरी घातली जात नाही आणि सात-बारावर नावही लागत नाही. 

योगायोगाने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत आणि महसूल मंत्रिपदाची धुरा तेच सांभाळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय करणार नाही, असे वारंवार सांगितले आहे. महसूलमंत्री दादा झाले म्हणून त्यांच्या काळात "सर्कल' मंडळींचा टेबलाखालचा व्यवहार सुरूच आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही हीच स्थिती होती. सरकार बदलले तरी सर्कल मंडळींची जुनी प्रवृत्ती कायम आहे. 

पहिल्यांदा चावडी आणि नंतर सर्कलकडे जायचे म्हटले तरी वजन ठेवल्याशिवाय काही होत नाही. याचा अनुभव करवीर तालुका घेऊ लागला आहे. परस्परांशी असलेले साटेलोटे यामुळे एखाद्या सर्कलने मध्यस्थी केली तरी अमुक एवढी मागणी होत असेल तर तमुक एवढे देऊन टाका, असा सल्ला दिला जात आहे. "साहेबांच्या प्रोटोकॉल'मधून कुणाचीही सुटका होत नाही. 

साखळी कार्यरत ... 

ज्यांचे काम अडचणीचे असेल, त्यांची तर आणखी पंचाईत होते. सात-बाराला नाव न लागल्यास व्यवहार पूर्ण होत नाहीत. बॅंका कर्जे देत नाहीत. अशी दुष्टचक्रात ही मंडळी अडकलेली आहेत. त्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन "प्रोटोकॉल' पूर्ण करण्यास भाग पाडले जाते. चावडी असो अथवा सर्कल, ऑफिस दस्त तयार करणाऱ्यांपासून ते दस्तावर मोहर उमटेपर्यंत साखळी कार्यरत आहे. या साखळीच्या माध्यमातून काम गेले तर ते मार्गी लागते. काम मध्येच लटकले की मग प्रोटोकॉल पाळावा लागतो. करवीर सर्कल मंडळींचा आकडा वाढत असून महसूलमंत्री चंद्रकांतदादा यावर कोणता मार्ग काढतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: karveer circle kolhapur