कसबे डिग्रज गाव होणार डिजिटल बोर्ड मुक्त

विजय लोहार
Tuesday, 22 September 2020

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे गेल्या काही दिवसात कोरोना सह इतर आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे काही कोरोना रुग्ण व इतर कारणास्तव अनेकांचे मृत्यू झाले.

तुंग : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे गेल्या काही दिवसात कोरोना सह इतर आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे काही कोरोना रुग्ण व इतर कारणास्तव अनेकांचे मृत्यू झाले. यापार्श्वभूमीवर गावात भावपूर्ण श्रद्धांजलीचे डिजिटल मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. या डिजिटलकडे वारंवार पाहण्यामुळे अनेकांच्या मनामध्ये कोरोनाची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही डिजिटल गावामध्ये न लावण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव नलवडे यांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. यापैकी अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. तसेच व्हायरल सदृश्‍य आजाराने अनेकांना घेरले आहे. या आजारामुळे ही अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. रोजच्या पाहण्यातील जिवाभावाची माणसं या कठीण प्रसंगांमध्ये मृत्यू पावलेले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारची भीती निर्माण झाली आहे. 

अनेकांची मने धास्तावलेली आहेत. अशातच या मृत्यू झालेल्या लोकांची प्रेमापोटी अनेकांनी डिजिटल बोर्डच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अशा प्रकारचे अनेक डिजिटल बोर्ड गावांमध्ये मुख्य रस्त्यासह चौकाचौकात मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे गावात फिरत असताना असे डिजिटल बोर्ड दिसत असल्याने ग्रामस्थांच्या मनात एक विशिष्ट प्रकारचा भीतीयुक्त धक्का बसला आहे. 

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि गावात सातत्याने होत असलेले मृत्यू यामुळे भीती निर्माण होत असतानाच या डिजिटल बोर्ड मुळेही या भीतीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आजारावर मात करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे बळ या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती आनंदराव नलवडे यांनी दिली. या निर्णयाचे ग्रामस्थांतून स्वागत होत आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasbe Digraj village will be digital board free

Tags
टॉपिकस
Topic Tags: