रूग्णांची धावपळ थांबणार; कवलापूर, कवठेमहांकाळला 25 बेडची सोय

अजित झळके 
Tuesday, 1 September 2020

जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांना गतीमान सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेने संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली आहे. कोरोना तपासण्यांची संख्या वाढवली आहे. बेड व्यवस्थापनावर भर दिला आहे.

सांगली : जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांना गतीमान सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेने संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली आहे. कोरोना तपासण्यांची संख्या वाढवली आहे. बेड व्यवस्थापनावर भर दिला आहे. रुग्णांचा भटकत रहावे लागू नये, यावर कटाक्षाने यंत्रणा काम करते आहे. कवठेमहांकाळ आणि कवलापूरला प्रत्येकी 25 बेडचे रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. लोकांनी यंत्रणेचा उपयोग करावा, संवादातून परिस्थिती हाताळावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. 

जिल्हा नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे उपस्थित होते. श्री. डुडी म्हणाले, ""ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि तेथील मृत्यूचा आकडाही वाढतो आहे. ही परिस्थिती गांभिर्याने हाताळली जात असून लोकांशी सतत संवाद साधला जातोय. रुग्णांच्या प्रकृतीची दिवसातून दोनवेळा विचारपूस केली जातेय. होम आयसोलशन केलेल्यांना औषधांचे कीट दिले गेले आहे. जे रुग्णालयात आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या जात आहेत. जिल्ह्यात 50 वर्षावरील 2 लाख 61 हजार लोकांची आरोग्य तपासणी केली. 5 हजार 125 नमुने तपासले. त्यातील 1471 लोक बाधित आढळले, ज्यांना काही लक्षणे नव्हती. ग्रामीण भागात अँटीजेन तपासण्या सुरु केल्या आहेत. त्यासाठी 1300 पथके कार्यरत आहेत. जी घरोघरी जावून तपासण्या करत आहेत.'' 

ते म्हणाले, ""रुग्णांना बेड हवेत तर त्यांनी जिल्हा परिषदेतील कक्षाशी संपर्क साधावा. त्यांना खासगी की शासकीय रुग्णालयात दाखल करायचे, याचा निर्णय येथे होईल. बेडची सोय झाल्यानंतरच लोकांनी घरातून निघावे, असे अपेक्षित आहे. त्यामुळे बाहेर फिरावे लागणार नाही. रुग्णांनी एकदा रुग्णालयात दाखल व्हायला प्राधान्य द्यावे. येथे आल्यानंतर ऑक्‍सिजन लावायचा की व्हेंटिलेटरची गरज आहे, हा निर्णय डॉक्‍टर घेतील. ग्रामीण भागातील रुग्णांचा सांगली, मिरजेतील ताण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहेच, मात्र यात शहरी व ग्रामीण असा भेदभाव करायचे कारण नाही. ही व्यवस्था सर्वांसाठी आहे. ग्रामीण रुग्णालयातही आम्ही शहरी रुग्णांवर उपचार करतोय.'' 

आयसीयूचे 361 बेड :
जितेंद्र डुडी म्हणाले, ""जिल्ह्यात 391 आयसीयू बेडची गरज होती. सध्या 361 आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी सुविधा वाढवल्या जात आहेत. 134 व्हेंटिलेटर आहेत, आज ठाण्यातून 10 येतील. धुळ्यातून 10 मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. रुग्णांना गतीमान आणि गरजेनुसार सेवा देण्यासाठी सर्व प्रयत्न ताकदीने सुरु आहेत.'' 

सूचना, आवाहन... 
- दुखणे अंगावर काढू नका, तत्काळ तपासणी करून घ्या 
- कोणतीही लक्षणे नसल्यास होम आयसोलेशन उपयुक्त 
- दहा दिवस खोलीत बंद, सात दिवस घरात... हेच महत्वाचे 
- स्टेप वन संस्थेतील वैद्यकीय तज्ज्ञांतर्फे दररोज समुपदेशन 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavalapur, Kavathemahankal 25 bed facility