कवठेएकंदला आतषबाजी विनाच दसरा सुना सुना

महावीर शिरोटे
Tuesday, 27 October 2020

श्री सिद्धराज महाराज यांची विजयादशमी दिवशीची ग्रामप्रदक्षिणा भक्तीभावाने शांततेत पार पडली. भाविकांचा हर हर गजरात शासकीय देखरेखेखाली सोहळा संपन्न झाला. यंदा कोरोनामुळे शोभेचे दारूकाम न केल्यामुळे आतषबाजी विनाच दसरा सुना सुना होता. 

कवठेएकंद : श्री सिद्धराज महाराज यांची विजयादशमी दिवशीची ग्रामप्रदक्षिणा भक्तीभावाने शांततेत पार पडली. भाविकांचा हर हर गजरात शासकीय देखरेखेखाली सोहळा संपन्न झाला. यंदा कोरोनामुळे शोभेचे दारूकाम न केल्यामुळे आतषबाजी विनाच दसरा सुना सुना होता. 

"श्रीं'ची पूजाअर्चा होऊन मंदिरातील पालखी प्रदक्षिणा परंपरेने मर्यादित लोकांच्या उपस्थित झाली. मंदिराच्या बाहेरील ग्राम प्रदक्षिणा सजवलेल्या शासकीय वाहनातून करण्यात आली. एसटी स्टॅंड येथील शिलंगण चौकात पाटील कट्टा येथे श्री सिद्धराज महाराज व श्री बिरदेव महालिंगराया यांच्या मूर्तीची पूजाअर्चा होऊन दसऱ्याचे आपटा पुजन झाले. चव्हाण- पाटील, गुरव-पुजारी, मानकरी- सेवेकरी, भाविकांच्या सानिध्यात मोठ्या पोलिस फौज फाटाच्या सुरक्षेत वाहनातून ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. नागाव कवठे येथे श्री नागनाथ महाराजांचा सोहळा भक्तीभावाने झाला. प्रदक्षिणा मार्गावरील ग्रामस्थ, भाविकांनी दारातुन दर्शन घेतले. ठिक ठिकाणी रांगोळी, विद्युत रोषणाई करण्यात आली. 

ग्रामप्रदक्षिणा करीत देवधरे येथे बहिणीच्या भेटीला "श्रीं'ची स्वारी पोचल्यावर विधीवत पूजाअर्चा होऊन मानकऱ्यांना प्रसाद वाटप झाले. "श्रीं'ची स्वारी परत मंदिरात येऊन गावकरी, सेवेकऱ्यांना देवस्थानच्या वतीने श्रीफळ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. कोरोना संक्रमणामुळे आतषबाजी करण्यास बंधन आले होते. गर्दी टाळण्यासाठी पालखी सोहळा रद्द झाला. उप विभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार आदींनी नियोजन केले होते. 

रांगोळीच्या माध्यमातून प्रबोधन 
विजयादशमीच्या निमित्ताने श्री सिद्धराज देवालयामध्ये पालखीमध्ये विराजमान झालेल्या शिवलिंगाची प्रतिमा साकारण्यात आली होती. तब्बल 14 तास परिश्रम घेऊन चिंचणी तालुका तासगाव येथील सागर जाधव यांनी कलाकृती रेखाटली. घरी रहा सुरक्षित रहा असा संदेश रांगोळी देण्यात आला होता. विठ्ठल मंदिर येथे आकाशतारा मंडळाच्यावतीने आपट्याच्या पानावरील विठ्ठलाची प्रतिकृती रांगोळीतून काढली.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavatheekanda heard Dussehra without fireworks