कवठे एकंदला दोन दिवसांत सापडले कोरोनाचे 15 रुग्ण 

गणेश कदम
Thursday, 13 August 2020

कवठे एकंद : येथे दोन दिवसांत कोरोनाचे पंधरा रुग्ण सापडले. पती-पत्नी, एक डॉक्‍टर असे बारा पुरुष व तीन महिला रुग्ण असे पंधरा जण पॉझिटिव्ह आले आहेत.

कवठे एकंद : येथे दोन दिवसांत कोरोनाचे पंधरा रुग्ण सापडले. पती-पत्नी, एक डॉक्‍टर असे बारा पुरुष व तीन महिला रुग्ण असे पंधरा जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या रूग्णांमुळे परिसरात धास्ती निर्माण झाली आहे. गावातील रुग्ण वीस झाले. त्यापैकी एक जण कोरोनामुक्त होऊन कालच घरी परतला. 

काल पॉझिटीव्ह आलेल्यांच्या संपर्क आलेल्या 66 जणांची आज अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आजपासून गावांत अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार पुढील दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

गावांत काल दुपारीच चौघांचा अहवाल आल्यानंतर तात्काळ त्यांना कोविड सेंटरला नेण्यात आले. आज दुपारी 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हे सर्वजण आधीच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कांतील होते. त्याचे स्वॅब शुक्रवारी घेतले होते. 

संपर्कातील आणखी व्यक्तींचे स्वॅब घेणे सुरू आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. तासगावच्या तहसिलदार कल्पना ढवळे, तासगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपा बापट, तासगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. एस. सूर्यवंशी व चिंचणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग सोनवणे यांनी ही माहिती दिली. रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या शोधाचे काम सुरु आहे. गेले चार महिने कष्टाने केलेल्या उपायांमुळे गावात कोरोना आला नव्हता. आता सुरवात झाली आहे. आता तरी गावातील नागरिकांनी स्वतःची व कुंटुंबियांची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in kavthe ekand 15 corona patients were found in two days