esakal | कवठेमहांकाळ नगरपंचायत वार्तापत्र : युवा नेत्यांचे मॅरेथॉन दौरे 
sakal

बोलून बातमी शोधा

Kavthemahankal Nagar Panchayat Newsletter : Marathon tours of young leaders

कवठेमहांकाळ तालुक्‍याचे मुख्य केंद्र आणि शहराचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक आगामी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत वार्तापत्र : युवा नेत्यांचे मॅरेथॉन दौरे 

sakal_logo
By
गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : तालुक्‍याचे मुख्य केंद्र आणि शहराचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक आगामी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे सत्ताकेंद्र आपल्याकडे ठेवण्यासाठी युवा नेत्यांनी शहराकडे लक्ष केंद्रित केले.

नगरपंचायत स्वबळावर आणण्यासाठी युवा नेत्यांनी वाद विवाद विसरून पुढाकार घेण्याची भूमिका घेतल्याने आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आघाड्या होणार की स्वतंत्र लढणार हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. एकंदरीतच मिशन नगरपंचायत सत्ताकेंद्रासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शहरात सध्या सतरा प्रभाग आहेत. गत साडेचार वर्षांत नगरपंचायतीच्या कारभाराविषयी अनेकवेळा वेगळे चित्र आणि चर्चा नागरिकांतून आहेत. नेत्यांनीही नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. नगरपंचायतीमध्ये आपला गट आपला पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी कंबर कसली आहे. याबाबतही वेगवेगळ्या सभापती निवडीत चित्र दिसले.

नगरपंचायत, पंचायत समितीचे सत्ताकेंद्र स्वबळावर लढून ताब्यात ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद दिले जाईल, असा विश्वास नुकताच कॉंग्रेसच्या शेतकरी संमेलनात वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी दिल्याने कॉंग्रेस रिचार्ज होऊ लागली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही हिंगणगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील, युवा नेते रोहित पाटील, शंतनू सगरे यांना एकत्रित राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केली. युवा नेत्यांनी शहरासह तालुक्‍यात दौरेही सुरू केले आहेत.

एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तालुक्‍यात लक्ष घालण्यास सुरवात केली आहे, तर दुसरीकडे बहुजन समाज पार्टीने ही नगरपंचायत लढण्याची भूमिका जाहीर केली. शिवसेना व भाजप यांनी अद्यापि कोणतीच भूमिका घेतली नाही. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही कोणतीच भूमिका जाहीर केली नाही.

नगरपंचायतीमध्ये गट मजबुतीकरणाचा नगरसेवकांनी पायंडा पडला आहे. आगामी निवडणुकीत नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आघाडी होणार की स्वबळावर लढणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. इच्छुकांना पक्ष संधी देणार का हाही प्रश्‍न आ वासून उभा आहे. विद्यमान नगरसेवकानी पुन्हा एकदा नगरपंचायतीत आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

नवीन प्रयोग होणार का? 
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष अनिता सगरे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने 12 जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवून एकही जागा जिंकता आली नाही. खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने चार जागा जिंकल्या होत्या. गत साडेचार वर्षांत अनेक वेगवेगळे राजकीय प्रयोग शहरातील नागरिकांना पहावयास मिळाले. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत कोणता नवीन राजकीय प्रयोग होणार हेही पहावे लागेल. 

संपादन :  युवराज यादव 

loading image