प्रवासास असुरक्षित... गुन्हेगारांना सुरक्षित!

अश्‍पाक पटेल
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

खंबाटकी घाट पुन्हा चर्चेत; मजबूत कामापेक्षा तात्पुरत्या उपाययोजनांवरच भर, आपत्कालीन व्यवस्थेकडेही दुर्लक्ष

खंडाळा - सध्या खंबाटकी घाट चर्चेचा विषय ठरत आहे. यावर्षी ता. १६ जूनला घाटातील पावसाच्या तांडवामुळे जीवघेणा संकटाचा ट्रेलर समोर आला व घाट रुंदीकरणातील त्रुटी निदर्शनास आल्या. दोन दिवसांपूर्वी खून केलेल्या तिशीतील तरुणाचा मृतदेह घाटात आढळून आल्याने खंबाटकी घाट हा गुन्हेगारांसाठी सुरक्षित जागा बनत असल्याचेही चित्र समोर आले. म्हणजे या ना त्या कारणाने खंबाटकी घाट हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे.

खंबाटकी घाट पुन्हा चर्चेत; मजबूत कामापेक्षा तात्पुरत्या उपाययोजनांवरच भर, आपत्कालीन व्यवस्थेकडेही दुर्लक्ष

खंडाळा - सध्या खंबाटकी घाट चर्चेचा विषय ठरत आहे. यावर्षी ता. १६ जूनला घाटातील पावसाच्या तांडवामुळे जीवघेणा संकटाचा ट्रेलर समोर आला व घाट रुंदीकरणातील त्रुटी निदर्शनास आल्या. दोन दिवसांपूर्वी खून केलेल्या तिशीतील तरुणाचा मृतदेह घाटात आढळून आल्याने खंबाटकी घाट हा गुन्हेगारांसाठी सुरक्षित जागा बनत असल्याचेही चित्र समोर आले. म्हणजे या ना त्या कारणाने खंबाटकी घाट हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे.

गेल्या महिन्यात घाटात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यानंतर दै. ‘सकाळ’ने रुंदीकरणाच्या कामाबद्दलचा लेखाजोखा मांडून उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्याची दखल घेत खंबाटकी घाटातील दरडी व डोंगरकड्यांना प्लॅस्टर सिमेंटचे थर लावण्यास सुरवात झाली आहे, तर लोखंडी जाळी बसविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. 

तात्पुरत्या उपाययोजनांवर भर
खंबाटकी घाटात रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. घाट चढताना दुसरे वळण हे धोकादायक होते. तेथे रस्त्यावर खडी टाकून रस्त्याची उंची वाढविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठे वळण घेणे सोपे होणार आहे. मात्र, घाटमाथ्यावर अवघड वळणावर अतिवृष्टीत तुटलेल्या लोखंडी ग्रीलमुळे वाहने खोल दरीत जाण्याची भीती असलेल्या ठिकाणी फक्त तात्पुरती मलमपट्टी म्हणून मोठे सिमेंटचे बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत. तेथे कठड्याचे मजबूत बांधकाम होणे अपेक्षित आहे.

प्रशासन व ठेकेदारच ‘बॉस’ 
महामार्ग सहापदरीकरणामुळे घाट रस्त्याच्या बाजूचे कडेही फोडण्यात आले. रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली. मात्र, डोंगराच्या कडेला 

रस्त्यालगत पाणी वाहून जाण्यासाठी फक्त दोन बाय तीन फूट असे अरुंद पाट (गटारे) असल्याने मोठ्या प्रमाणात डोंगरावरून येणाऱ्या पाण्यासाठी हे पाट अपुरे पडत आहेत. पावसाबरोबर येणारी माती साचत असल्याने पाटात पाणी बसत नाही. परिणामी, पाणी रस्त्यावर येते. त्याचे प्रात्यक्षिक १६ जूनला प्रत्यक्षात दिसल्यानंतरही प्रशासनाने कानाडोळा केला असल्याचे सध्याचे चित्र आहे. गटाराच्या कामात पाटाची रुंदी व उंची न वाढवता पूर्वीप्रमाणेच काम केले जात आहे. पावसाच्या पाण्याला वाट मिळावी म्हणून डोंगराकडेने मोठ्या रुंदीचे पाट तयार करावेत, अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे डोंगरावरील पाणी रस्त्याखालून जाण्यासाठी सिमेंट नळ्या टाकण्यात आल्या आहेत. या नळ्या डोंगराला चिटकवून बसविल्याने पाणी जायला जागाच नाही. 

गुन्हेगारीसाठी सुरक्षित जागा
अज्ञात युवकाचा गळा आवळून खून करून मृतदेह घाटातील दरीत फेकल्याची घटना उघडीस आल्यानंतर खंबाटकी घाट हा गुन्हेगारांसाठी सुरक्षित जागा असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे यापुढील काळात खंडाळा पोलिसांना विविध उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

घाटात गटाराचे हाती घेण्यात आले आहे. मात्र, या गटारांची रुंदी खुपच कमी आहे. त्याशिवाय डोंगरातील दगड गटारात पडत आहेत.

आश्वासनाला केराची टोपली
खंबाटकी घाटात अतिवृष्टी झाल्यानंतर रिलायन्स कंपनीचे हरीश मंगलानी, ‘एनएचएआय’चे व्यवस्थापक श्रीकांत पोतदार व ‘एनएचएआय’चे अनुपम खरे यांनी १७ जूनला तत्काळ पाहणी करून पुढील कामाची दिशा ठरवून दिली. महामार्गावरील दोन्ही बाजूला तत्काळ आपत्तीकालीन काळात उपाययोजना उपलब्ध होण्यासाठी महिन्यात खंबाटकीच्या पायथ्याशी असणाऱ्या जुन्या टोलनाक्‍यावर आपत्कालीन व्यवस्था निर्माण करणार असल्याचे श्री. पोतदार यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही याबाबतची कसलीच आपत्कालीन उपाययोजना केली गेलेली नाही.

Web Title: khandala news journey unsecure criminal secure