खरसुंडी एक किलोमीटरचा परिसर जनावरांनी व्यापला 

हमीद शेख
Saturday, 30 January 2021

माणपट्ट्यात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी पौषी यात्रेत खिल्लार जनावरांची आवक 30 हजारांहून अधिक झाली आहे. यात्रेचे बाजारस्थळ बदलण्यात आल्याने व कोरोनामुळे एक वर्षभर कोणत्याच यात्रा न झाल्याने पहिलीच खिल्लार जनावरांची यात्रा भरल्याने एक किलोमीटरचा परिसर जनावरांनी व्यापला आहे.

खरसुंडी : माणपट्ट्यात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी पौषी यात्रेत खिल्लार जनावरांची आवक 30 हजारांहून अधिक झाली आहे. यात्रेचे बाजारस्थळ बदलण्यात आल्याने व कोरोनामुळे एक वर्षभर कोणत्याच यात्रा न झाल्याने पहिलीच खिल्लार जनावरांची यात्रा भरल्याने एक किलोमीटरचा परिसर जनावरांनी व्यापला आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होईल. पशुधन व शेतकऱ्यांचा विचार करून तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी यात्रेस परवानगी मिळवली आहे. 

खरसुंडी सिद्धनाथांची पौषी यात्रा राज्यासह तीन राज्यांत प्रसिद्ध आहे. मान पट्ट्यातील आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ, माण व जत तालुक्‍यांतील पशुधन शेतकरी खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणात पैदास करतात. याठिकाणी पैदास केंद्रेही आहेत. शौकिन शेतकरी पैदासी करताना जातिवंत खिल्लार, वळीव बैलांचे पालन करतात. शारीरिकदृष्ट्या खिल्लार जनावरे शेतीच्या कामासाठी उपयुक्त असल्याने याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ होत असतो. 

कोरोनामुळे वर्षभर राज्यात कोणत्या यात्रा न झाल्याने शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत आले. परिणामी, शेतकरीही आर्थिक अडचणीत आला. यावर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागला. एक वर्षानंतर पहिलीच पौषी यात्रा खरसुंडी येथे भरण्यास परवानगी मिळाल्याने यात्रेत जनावरांची आवक 30 हजारांहून अधिक झाली आहे. बाजारस्थळ बदलल्याने खरसुंडीपासून एक किलोमीटरवर मोकळ्या मैदानात सुमारे एक किलोमीटरचा परिसर जनावरांनी व्यापला आहे. नगर, मराठवाडा, विदर्भ व कर्नाटक, आंध्र प्रदेशातील व्यापारी मोठ्या संख्येने खरेदीसाठी खरसुंडीत दाखल झाले आहेत. 

गेली कित्येक वर्षे खिल्लार जनावरांची पौषी व चैत्री यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अधिग्रहीत करण्यात आलेल्या गाव सभोवतालच्या जागेवर भरत होती. गावचे गावठाण वाढत गेल्याने यात्रेस परिसर कमी पडू लागला. यंदा कोरोना पार्श्वभूमीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताना गावापासून एक किलोमीटर अंतरावर दिली. एक ठिकाणी यात्रा एकवटल्याने पशुधन शेतकरी व व्यापाऱ्यांना फायदेशीर ठरले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतीने या ठिकाणी वीज, पाणी व इतरही सुविधा यात्रेसाठी दिल्या आहेत. यात्रेत दोरखंड वगळता इतर कोणत्याच व्यावसायिकांना दुकाने थाटण्यात मनाई करण्यात आली आहे. 

पशुधन जोपासणारे शेतकरी कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आल्याने शेतकऱ्यांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांकडून यात्रेस परवानगी घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासणे लोकप्रतिनिधींचे काम आहे. नियमांचे पालन करण्याच्या बाजार समितीस सूचना दिल्या आहेत. 
- राजेंद्र देशमुख, माजी आमदार 

यात्रेतील बाजारस्थळ बदलण्यात आल्याने यावर्षी थोडा त्रास जाणवला. मात्र, यात्रेस जागा योग्य असल्याने पुढे चांगल्या प्रकारे यात्रेचे नियोजन करता येऊ शकते. बाजार समितीतर्फे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 
- भाऊसाहेब गायकवाड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharsundi was covered with animals for a distance of one kilometer