
माफियांच्या सरकारमधून महाराष्ट्राची मुक्तता करणार ; किरीट सोमय्या
आटपाडी: ‘‘महाराष्ट्राला लुटणाऱ्या आणि फक्त वसुली करणाऱ्या माफियांच्या सरकारमधून महाराष्ट्राची मुक्तता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’’ अशी गर्जना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.बनपुरी (ता. आटपाडी) येथे मंगळवारी जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार सदाभाऊ खोत प्रमुख उपस्थित होते.
सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेने पंतप्रधान मोदींच्या नावाने मते मागून आमदार-खासदार निवडून आणले. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःचे इमान विकून भाजप आणि महाराष्ट्राशी बेइमानी केली. त्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही.’’
ते म्हणाले, ‘‘राज्यात सध्या काहीच चांगलं चाललेलं नाही. रोज एक घोटाळा बाहेर येतोय. शेतकरी वीज, पाण्यामुळे देशोधडीला लावला आहे. महाराष्ट्रात ठाकरे-पवार जोडी महागाई वाढविण्याचे काम करत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोलचा ट्रॅक्स प्रतिलिटर १९ रुपये, तर डिझेलचा १६ रुपये कमी करून मोठा दिलासा दिला आहे. मात्र ठाकरे-पवारांच्या महाराष्ट्र सरकारने अवघा दीड रुपया कमी करून चेष्टा केली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत टॅक्स कमी करावाच लागेल. हे माफियांचे सरकार घालवल्याशिवाय शांत बसणार नाही.’’ यावेळी सोमय्या यांनी गोपीचंद पडळकर यांचे खास कौतुक केले.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. फडणवीस सरकारने राज्यात आदर्शवत कामे केली होती. मात्र जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या नवीन योजना आणल्या नाहीत. उलट त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या ठेकेदाराला परत आणून बिले काढण्याचे काम केले आहे.’’
माजी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘हे सरकार आंधळे, बहिरे आणि मुके आहे. शेतकरी अडचणीत आहे. ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे.’’
आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच सुनीता पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती डॉ. भूमिका बेरगळ, अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना गायकवाड,अरुण बालटे, विष्णू अर्जुन, महादेव पाटील आदी उपस्थित होते.
Web Title: Kirit Somaiya Maharashtra Mafia Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..