नरसिंहपूर ऊस पिकांत गुडघाभर पाणी ; क्षारपडचा धोका 

शिवकुमार पाटील  
Wednesday, 26 August 2020

नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे ऊस पिकांत गुडघाभर पाणी साचून राहिल्याने पीक हातचे जाऊन जमीन क्षारपड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उसाचे वाडेच शेतकऱ्यांच्या हाती राहील, अशी स्थिती आहे.

किल्लेमच्छिंद्रगड  : नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे ऊस पिकांत गुडघाभर पाणी साचून राहिल्याने पीक हातचे जाऊन जमीन क्षारपड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उसाचे वाडेच शेतकऱ्यांच्या हाती राहील, अशी स्थिती आहे. सऱ्यांत पाणी साचल्याने यंदा ऊस लागवडीचा खर्च निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. कोरोनासह पावसाचे संकट कोसळल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत. 

नरसिंहपूरमध्ये पूर्वपार उसाचे पीक घेतले जाते. पीक पद्धतीत बदल न केल्याने, भूगर्भ रचनेचे आकलन नसल्याने क्षारपड जमिनीची समस्या मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. जमिन वरून सुदृढ दिसत असली तरी आतून आरोग्य बिघडले आहे. तीन फुटांखाली पावसाच्या व वरून दिलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने माती तेलकट, चिकट बनली आहे. 
काळा पाषाणावर जमिनी असल्याने पाणी मुरणे थांबून क्षारपडची समस्या तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात जमिनी जलमय होतात. गावास नापिकीच्या संकटाने घेरले आहे. 

राज्य शासनाने क्षारपड जमीन सुधारणा योजना जाहीर केली. योजनेत भाग घेऊन क्षारपड जमीन सुधारणा केली तर क्षारपडची समस्या निकाली निघेल. वर्षानुवर्षीच्या ऊस शेतीचा पर्याय अवलंबल्याने नजीकच्या काळात सोन्यासारख्या जमिनी मिठागरे बनतील, अशी स्थिती आहे. 
अशीच स्थिती तालुक्‍यातील शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, किल्लेमच्छिंद्रगड, ताकारीपासून रेठरे हरणाक्षपर्यंतच्या शिवारात आहे. पाण्याचा अतिरेक झाल्यामुळे गुंठ्यास अर्धा टन तरी उतारा मिळेल की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.  

 

संपादन  प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knee-deep water in Narsinghpur sugarcane crop; Danger of alkalinity