#Jaganelive अंबाबाई मंदिर बनले पोटापाण्याचा आधार !

संभाजी गंडमाळे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

जगणं लाईव्‍ह!
प्रत्येक बातमीच्या मागे असते एक कहाणी. सुख-दु:खाच्या या ‘लाईव्ह’ कहाण्या शोधून आमच्या बातमीदारांनी यंदाच्या दिवाळी विशेषांकात ‘रिपोर्ताज’ स्वरूपात सविस्तर मांडल्यात. दिवाळी अंक तुमच्या हातात पडण्यापूर्वी रोजच्या अंकात बातम्यांच्या रूपात या कहाण्यांचे ‘ट्रेलर’ आम्ही देणार आहोत. अर्थात खरी मेजवानी मिळेल, ‘सकाळ दिवाळी २०१८’च्या विशेषांकात...

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ. त्याचं ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक माहात्म्यही तितकंच मोठ्ठं. मंदिर शहराच्या मध्यवस्तीत आणि त्याच्या आजूबाजूला रोजगारांचं एक महाजाळंच विणलं गेलं आहे. नाही म्हटलं, तरी किमान आठ ते दहा हजार कुटुंबांना या परिसरानं सामावून घेतलं आहे. कुणी फेरीवाला, कुणी खाद्यपदार्थ विकणारा, कुणी हारवाला, कुणी फुलवाला तर कुणी खेळणीवाला. मंदिराच्या चारही प्रमुख दरवाजांच्या बाहेरून एक प्रदक्षिणा केली, की ही माणसं भरभरून बोलत असतात. अंबाबाईच्या आशीवार्दानं आमचा संसार सुखाचा चालला असल्याचं आवर्जून सांगत राहतात. 

अंबाबाई मंदिर परिसर अपंग व अंधांसाठी तर नक्कीच एक पुनर्वसन केंद्रच ठरला आहे. रवींद्र गाडेकर, विनोद देवगड, जयपाल कांबळे ही अंध मंडळी मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर हमखास भेटतात. ‘रव्या, विन्या गर्दी जास्त आहे, बाजूला थांबा. बाजूला थांबा,’ 

असं त्यांना वारंवार सांगितलं जात असतं. पण इतक्‍या वर्षांच्या अनुभवातून आता तेही तितकेच समंजस झालेत. गर्दीपासून त्यांना लांब थांबून कसं चालेल? दिवसभराची कमाई व्हायची असेल, तर थोडं ओरडूनही घेतलंच पाहिजे. गाडेकर गेली तीस वर्षे मंदिर परिसरात खेळणी विक्रीचा व्यवसाय करतात. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांची दृष्टी कमी होऊ लागली आणि अंधत्व आलं. ते राहायला सुभाषनगरात. रोज सकाळी मिळेल ती बस-रिक्षा पकडून मंदिर गाठतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. त्यांच्या पत्नी अंध नाहीत; मात्र त्या आणि मुलंही कधी कधी मदतीसाठी हजर असतात. विनोद, जयपाल आदी मंडळींच्या प्रेरणादायी कथाही अशाच. या साऱ्यांनी मिळून शहरातील अंध कलाकारांची मोट बांधली आहे आणि ‘स्वरसंगीत’ वाद्यवृंदाची निर्मिती केली आहे. त्यांच्या एकूणच धडपडीकडं पाहिलं, की श्रममहर्षी बाबा आमटे यांच्या कवितेच्या ओळी आठवतात...‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही...’

दक्षिण दरवाजाच्या बाहेरून पुढे जाताना दर्शनरांगेत हार आणि वेणी विकणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही तीसहून अधिक. कॅमेरा घेऊन त्यांच्याकडे जाताच ‘नको नको नको...आमची कशाला काय बातमी’ असे म्हणत ते लांब जातात. पण, विषय समजावून सांगितल्यानंतर ते बोलू लागतात....‘‘काय करायचं राव. सगळ्या घरची जबाबदारी आमच्यावर आहे. लय शिकून कुठं मोठी नोकरी मिळणार हाय. त्यापेक्षा हेच काम बरं. तीस-पस्तीस वर्षे इथं हार, कमळ आणि वेण्या विकणारी काही ज्येष्ठ मंडळीही आहेत. आम्ही सारे एकमेकांना मदत करतच व्यवसाय करतो.’’

पोरं शिकली पाहिजेत. स्वतःच्या पायावर खमकेपणाने उभी राहिली पाहिजेत. जिथं जातील तिथं त्यांनी नाव केलं पाहिजे. त्याचसाठी ही सारी धडपड आहे.
- रवींद्र गाडेकर,
विक्रेते 

गेल्या आठ-दहा वर्षांत गर्दी वाढली आणि आमची संख्याही वाढली. साऱ्यांचीच पोटं या व्यवसायावर आहेत. रोज सरासरी तिसेक हार आणि तेवढ्याच वेण्या विकतो. 
- सदाशिव राख,
विक्रेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Ambabai Temple is our Survival Base