#KolhapurFloods शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांनी जनावरे बांधली टेरेसवर

संजय खुळ
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

इचलकरंजी - शिरोळ तालुक्यातील 40 गावांना पुराचा फटका बसला आहे. या गावात प्रत्येक शेतकरी आपल्या सुरक्षितते बरोबरच जनावरांच्या सुरक्षिततेलाही तेवढेच महत्त्व देत आहे. घालवाड, शिरूर येथील शेतकऱ्यांनी तब्बल 400 हून अधिक जनावरे चक्क टेरेसवर बांधली आहेत.

इचलकरंजी - शिरोळ तालुक्यातील 40 गावांना पुराचा फटका बसला आहे. या गावात प्रत्येक शेतकरी आपल्या सुरक्षितते बरोबरच जनावरांच्या सुरक्षिततेलाही तेवढेच महत्त्व देत आहे. घालवाड, शिरूर येथील शेतकऱ्यांनी तब्बल 400 हून अधिक जनावरे चक्क टेरेसवर बांधली आहेत.

गावात उपलब्ध असलेल्या प्रत्येक टेरेसवर ही जनावरे बांधण्यात आली असून त्यांच्या चारा पाण्याच्या सोयीसाठी तब्बल 40 ते 50 जण महापुरात थांबून आहेत.

शिरोळ तालुक्यातील चाळीसहून अधिक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. तब्बल एक लाख 47 हजार नागरिक स्थलांतरित झाले असून तीस हजार जनावरेही त्यांच्यासोबत आली आहेत. ज्या गावांमध्ये पुराच्या पाण्याने आपण वेढले जाईल असा अंदाज आला नाही त्या गावातील नागरिकांची मात्र मोठी धांदल उडाली. रस्त्यावर सहा ते सात फुटांहून अधिक पाणी असल्यामुळे जनावरांना घेऊन जाणे मुश्किल झाले. त्यामुळे गावात असणारी चारशे जनावरे प्रत्येक नागरिकांच्या टेरेसवर बांधण्याचा निर्णय झाला.

जागा मिळेल तेथे बांधली जनावरे

शिरोळ तालुक्यातील जे रस्ते सध्या रिकामे आहेत त्या रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येक ठिकाणी जनावरे बांधल्याचे चित्र पाहावयास मिळते. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जनावरांसाठी छावणी उभारणे शक्य नाही. त्यामुळे मिळेल त्या जागी शेतकऱ्यांनी आपली जनावरे बांधली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Farmers built livestock on terraces in Shirola taluka