#KolhapurFloods महापुरातही नृसिंहवाडीत श्रींचा अखंडपणे पूजाविधी

संजय खुळ
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

शिरोळ - लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थानची पूजा महापुरातही नियमीतपणे सुरू आहे. आज पुजेसाठी लागणारे साहित्य बोटीद्वारे पाठवून ही परंपरा अखंडपणे सुरूच ठेवण्यात आली. या सेवेसाठी तब्बल 40 हून अधिक पुजारी चौफेर पाणी असतानाही नृसिंहवाडी येथेच तळ ठोकून राहिले आहेत.

नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थान देशभर प्रसिध्द आहे. लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. महापूर आला की अनेकवेळा देवाची मुर्ती मंदिरातून बाहेर आणून पुजा केली जाते. यावेळी मात्र महापुराने संपूर्ण गावच स्थलांतरीत केले आहे. अनेक वर्षे असलेली पूजेची परंपरा महापुराच्या काळातही अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्णय तेथील पुजारी वर्गाने केला. संपूर्ण गाव स्थलांतरीत झाले तरी हे पुजारी याच ठिकाणी एका उंच इमारतीमध्ये राहिले आहेत.

श्रावणातील प्रथेप्रमाणे दररोज श्रींची पूजा सुरू आहे. पहाटे काकड आरती, श्रावणनिमित्त रूद्र एकादशमी तर दुपारी बारा वाजता महापुजा केली जाते. याचबरोबर रात्री साडेसात वाजता धुपआरती आणि स्त्रोत पठणाचा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे. पुजेसाठी लागणारे दुध, तुळस, फुले व फळे आज बोटीद्वारे पाठवून पुजा अखंडीत ठेवण्याची प्रथा सुरू ठेवली. तेथे कार्यरत असणार्‍या 40 पुजार्‍यांसाठी जीवनावश्यक वस्तू, पाण्याचे बोटल, फराळाचे पदार्थ व अन्य खाद्य पदार्थही आज नृसिंहवाडी ग्रामस्थांनी बोटीतून पाठवले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Narsinghwadi Datta puja in flood also