#KolhapurFloods इथं‌ १७ जणांची‌‌ सुरू आहे भीषण महापुराशी झुंज...

संजय खुळ
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

इचलकरंजी - शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मळे भागात 17 जणांना घेऊन येणारी नाव मध्येच अडकली आहे. हे सर्व 17 प्रवासी सध्या धोक्याच्या स्थितीत असून प्रशासनाकडून त्यांची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

इचलकरंजी - शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मळे भागात 17 जणांना घेऊन येणारी नाव मध्येच अडकली आहे. हे सर्व 17 प्रवासी सध्या धोक्याच्या स्थितीत असून प्रशासनाकडून त्यांची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी भागाला यापूर्वीच पुराच्या पाण्याने वेढले आहे. नृसिंहवाडीतील संपूर्ण नागरिकांना यापूर्वीच स्थलांतरीत केले आहे. मळे भागातील नागरिक मात्र जनावरे व अन्य कामासाठी तेथेच राहिले. सध्या शिरोळ तालुक्यात एनडीआरएफच्या नऊ तुकड्या असून या तुकड्या राजापूर, खिद्रापूर तसेच कनवाड, बस्तवाड या भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे शिरोळमध्ये यांत्रिक बोटच नाही.

प्रशासनाला 17 नागरिक नृसिंहवाडीच्या मळे भागात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना उपलब्ध नावेद्वारे शिरटी - हसूर मार्गे बाहेर काढण्यात येत होते. मात्र ही नाव एका ठिकाणी मध्येच अडकली. मोठे प्रयत्न करूनही नाव पुढेही जाईना व मागेही सरकत नसल्याने तात्काळ शिरोळ तहसील कार्यालयाला याबाबतची माहिती देण्यात आली.

दुपारी अडीचच्या दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने या सर्वांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या ही नाव तेथे लगतच असलेल्या झाडाला बांधून ठेवण्यात आली आहे. मात्र एकूण पाण्याचा वेग आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी असणारे प्रचंड अंतर यामुळे हे सध्या 17 जण धोक्याच्या स्थितीत असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Shirol Taluka Rescue operation report