कठीण परिस्थितीतून मिळविलेल्या तिच्या यशाने आईचे डोळे पाणावले

संजय खूळ  
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुलीने आजपर्यंत ठेवलेला विश्‍वास सार्थ करून दाखवला. यापुढील काळात सायकलिंगमध्ये ती देशाला नक्कीच पदक मिळवून देईल, असा विश्‍वास अर्चना बबन दानोळे यांनी व्यक्त केला. इंगळी (ता. हातकणंगले) येथे पूजा बबन दानोळे हिने खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्णपदकासह एक कास्य पदक मिळवून यशाला एक वेगळी किनार दिली आहे.

इचलकरंजी (कोल्हापूर) : मुलीने आजपर्यंत ठेवलेला विश्‍वास सार्थ करून दाखवला. यापुढील काळात सायकलिंगमध्ये ती देशाला नक्कीच पदक मिळवून देईल, असा विश्‍वास अर्चना बबन दानोळे यांनी व्यक्त केला. इंगळी (ता. हातकणंगले) येथे पूजा बबन दानोळे हिने खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्णपदकासह एक कास्य पदक मिळवून यशाला एक वेगळी किनार दिली आहे. तिच्या या यशानंतर आज दिवसभर दानोळे कुटुंबियांचे घर शुभेच्छांच्या वर्षावात न्हाऊन गेले आहे.

हे पण वाचा - या पोस्टकार्डने जोडली १५१ देशांमधली माणसं ! -

गुवाहाटी आसाम येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत पूजा हिने आज तिसरे सुवर्णपदक व सांघिकमध्ये एक कास्य पदक मिळवून इतिहास रचला आहे. आज या यशाची बातमी समजताच दानोळे कुटुंबियांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. हातकणंगले तालुक्‍यातील इंगळी या छोट्याशा गावातील सामान्य कुटुंबातील पूजाने केवळ चार वर्षात १४ राष्ट्रीय स्तरावरचे सुवर्णपदक मिळवून देशात आपले नाव अव्वल ठेवले आहे. तिची ही कामगिरी पाहून भारतीय क्रीडा प्रबोधिनी (साई) हिची दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. पूजाचे दिल्ली येथील प्रशिक्षक अनिलकुमार यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना पूजा यावर्षीच्या खेलो इंडियामध्ये नक्कीच वेगळी कामगिरी करेल, असा विश्‍वास होता. तो विश्‍वास तिने सार्थ ठरविला.
प्राथमिक शिक्षण घेत असताना दररोज इंगळी ते पट्टणकोडोली असा सायकलने प्रवास करणाऱ्या पूजाची गुणवत्ता अनंत विद्यामंदिर येथील क्रीडा शिक्षक कुंभार यांच्या लक्षात आली. त्यांनी तिला शालेय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमध्ये सहभागी होण्यास सांगितले. साधी सायकल घेऊन पूजा या स्पर्धेत सहभागी झाली. मात्र स्पर्धा सुरू असतानाच ती खाली पडली. ती पुन्हा जिद्दीने उठून स्पर्धेत सहभागी झाली व तिसरा क्रमांक मिळवला. त्यानंतर पूजाने मागे वळून पाहिलेच नाही. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पूजाने कुटुंबियांचा विश्‍वास सार्थ ठरविला. सातवीनंतर दोन वर्षे क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे सराव केल्यानंतर तिची दिल्ली येथील साईमध्ये निवड झाली. आणि त्यानंतर तिची यशाची झळाळी कायम राहिली. 

हे पण वाचा -  कोल्हापूर जिल्हा काबीज करण्यासाठी भाजपची ही नवी रणनीती... -

पहाटे पाचपासून सराव
पूजा इंगळी या छोट्याशा गावातून पहाटे पाचला उठून इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावरील रूई फाट्यावर तेथून तिळवणी, माणगाव, चोकाक, हेर्ले, उचगांवमार्गे ती इंगळीला परतली. तब्बल २ ते ३ तास सलग सायकलिंगचा सराव करत तिने आपला आत्मविश्‍वास वाढविला. आणि त्यातून ती यशस्वी होत गेली.

देशाला पदक मिळवून देईल
पूजा ही अत्यंत जिद्दी आणि मेहनती आहे. पूजाचे वडिल व भाऊ यांनी कुस्तीमध्ये यश मिळविले आहे. खेळाची परंपरा ती कायम ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ती देशाला नक्कीच पदक मिळवून देईल.
अर्चना बबन दानोळे, पूजाची आई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur girl archana danole three gold medal win in khelo india