जनता दलाभोवती ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेने’चा पिंगा...!

अजित माद्याळे
सोमवार, 4 मार्च 2019

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह सुपुत्र वीरेंद्र मंडलिक व प्रमुख कार्यकर्त्यांनी ॲड. शिंदे यांच्यासह शहरातील नगरसेवकांची भेट घेऊन मदतीचे आवाहन केले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी आलेले शरद पवार यांनी तर थेट शिंदे यांच्या घरचा नाश्‍ता घेतला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.

कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या घरी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट आणि त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या शिंदे यांच्या कौतुकामागचा हेतूही लपून राहिलेला नाही.

सलग दोनवेळा आमदारकी भूषविलेले जनता दलाचे नेते ॲड. शिंदे यांनी चळवळी व आंदोलनांच्या माध्यमातून गटाचे अस्तित्व टिकवून ठेवले. संपूर्ण महाराष्ट्रात गडहिंग्लजची एकमेव नगरपालिका जनता दलाच्या ताब्यात आहे. राज्यातील अस्तित्व काहीही असले तरी गडहिंग्लजमध्ये या पक्षाची निर्णायक ताकद कोणीही नाकारू शकत नाही. खुद्द शरद पवार आणि ॲड. शिंदे यांचे राजकीय संबंधही सर्वश्रुत आहेत. या सबंधांमुळे श्री. पवार यांच्या विनंतीला मान देऊन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत ॲड. शिंदे यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीचे नेते स्व. बाबा कुपेकर यांना पाठिंबा दिला. तेव्हापासून या भागात राष्ट्रवादीचा आमदार कायम आहे. परंतु, जनता दलाच्या मतांकडेही कोणी दुर्लक्ष करीत नाही, हेसुद्धा वास्तव आहे. 

लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ॲड. शिंदे यांची मनधरणी सुरू झाली आहे. शहरासह तालुक्‍यातील बहुतांश ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते आजही कट्टर आहेत. प्रत्येक विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जनता दलाला वगळून राजकारण होऊ शकत नाही हे अधोरेखित झाले आहे. ही पार्श्‍वभूमी पाहून यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही जनता दलाची मते आपल्याच पारड्यात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पिंगा वाढत आहे.

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह सुपुत्र वीरेंद्र मंडलिक व प्रमुख कार्यकर्त्यांनी ॲड. शिंदे यांच्यासह शहरातील नगरसेवकांची भेट घेऊन मदतीचे आवाहन केले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी आलेले शरद पवार यांनी तर थेट शिंदे यांच्या घरचा नाश्‍ता घेतला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. याशिवाय शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांशीही त्यांनी संपर्क साधला. निवडणुकीच्या फिल्डिंगमध्ये जनता दलासारख्या खेळाडूला सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेने कंबर कसली आहे.

भूमिकेचा थांगपत्ता नाही..!
निवडणुकीतील भूमिकेवर चर्चा करण्यासाठी जनता दलाने बोलावलेल्या मेळाव्यात भूमिका तर जाहीर झालीच नाही, मात्र जातीयवादी पक्षांसह राष्ट्रवादीवरही त्यांनी टीका केली. यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अजून तरी थांगपत्ता लागत नाही. ॲड. शिंदे व स्व. सदाशिवराव मंडलिक हे शालेय जीवनापासूनचे मित्र. गतवेळी स्व. मंडलिकांचे सुपुत्र प्रा. संजय यांना ॲड. शिंदे यांनी पाठबळ दिले. केंद्र व राज्यस्तरावर जी पक्षाची भूमिका असेल, त्यासोबत जाण्याचा निर्णय भेटीसाठी येणाऱ्या संभाव्य उमेदवारांना ॲड. शिंदे सांगत आहेत. दरम्यान, एकीकडे मंडलिक घराण्याची शिंदे कुटुंबीयांशी जवळीक असल्याने समाजवादी जनता दल यंदाही शिवसेनेला साथ देण्याची पुनरावृत्ती करणार की राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन शरद पवारांशी असलेले ऋणानुबंध घट्ट करणार ? याकडेच सर्वांचे लक्ष असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Lok Sabha Constituency Special